नोकर निघाला घरभेदी

नवी मुंबई : सानपाडा येथे राहणाऱ्या कस्टम अधिकाऱ्याकडे कामाला असलेल्या नोकराने त्यांच्या घरातील तब्बल ३६ लाखांचा ऐवज चोरुन घरफोडी झाल्याचा बनाव रचला होता. तसेच त्याने सानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, सानपाडा पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करत नोकरालाच अटक करुन त्याने चोरलेला सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे. न्यायालयाने या आरोपीचे न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.  

शिवा सिंह (२०) असे या चोरट्याचे नाव असून तो मुळचा उत्तर प्रदेश राज्यातील आहे. मागील २-३ वर्षापासून तो सानपाडा येथे राहणारे कस्टम अधिकारी कुमार अभिषेक मिश्रा यांच्या घरात नोकर म्हणून काम करत होता. त्यामुळे कस्टम अधिकारी मिश्रा यांनी शिवावर विश्वास ठेवून त्याला आपल्या घरामध्येच राहण्यासाठी जागा दिली होती. यादरम्यान त्याने मिश्रा यांच्याकडे असलेले दाग-दागिने पाहिले होते. १० एप्रिल रोजी मिश्रा सहकुटुंब दिल्लीला गेले होते. यादरम्यान घरामध्ये चालक आणि नोकर शिवा असे दोघेच होते. चालक देखील काही दिवसानंतर आपल्या गावी गेल्यानंतर नोकर शिवा एकटाच घरामध्ये होता. १७ एप्रिल रोजी तो देखील आपल्या मुळ गावी उत्तरप्रदेश येथे जाणार असल्याचे त्याने मिश्रा यांना सांगितले होते.  

त्यानुसार १६ एप्रिल रोजी नोकर शिवा याने मिश्रा यांच्या घरातील तब्बल ३६ लाख ८७ हजाराचा ऐवज चोरुन ठरल्याप्रमाणे १७ एप्रिलला आपल्या मुळ गावी पलायन केले. तसेच चोरलेले सर्व दागिने आपल्या मुळ गावी ठेवून २९ एप्रिल रोजी तो पुन्हा सानपाडा येथे परतला. त्यानंतर त्याने मिश्रा यांच्या घराच्या दरवाजाचे चोरट्यांनी कुलूप तोडून घरफोडी केल्याचा बनाव रचला. तसेच त्याबाबतची माहिती मिश्रा यांना फोनवरुन दिली. मिश्रा यांनी नोकर शिवा याला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितल्यानंतर त्याने सानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार सानपाडा पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली.  

अशी उघड झाली बनवेगिरी...

सानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक देविदास कठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल मुंडे, पोलीस हवालदार सुनील चव्हाण, श्रीकांत नार्वेकर, बडे, पवार आदच्या पथकाने या प्रकरणाचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच आजुबाजुला चौकशी केली. मात्र, घरफोडी झाल्याचे कोणताही ठोस पुरावे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. त्यामुळे नोकर शिवा याच्यावर संशय बळावल्याने पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक करुन त्याने उत्तर प्रदेश येथे मुळ गावी लपवून ठेवलेले सर्व दागिने उत्तर प्रदेश येथून हस्तगत केले. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

पनवेलमध्ये महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार