वीज समस्या न सोडविल्यास तीव्र आंदोलन

उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असून वीज बिल देखील जास्त येणे आणि अन्य समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. या संदर्भात ‘महावितरण'ने तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ‘शिवसेना'तर्फे महावितरण कार्यालयामध्ये आयोजित बैठकीत देण्यात आला आहे.

शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखालील साईबाबा मंदिर येथील महावितरण कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कल्याण तेजश्री मुख्य अभियंता विजय फुंदे, उल्हासनगरचे कार्यकारी अभियंता हरीश भराडे यांच्या सोबत सर्व समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्यांबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा. अन्यथा ‘शिवसेना'च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला .

‘शिवसेना'च्या या भूमिकेनंतर उपस्थित ‘महावितरण'च्या अधिकाऱ्यांनी सदर सर्व समस्या एक महिन्यात सोडविण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप गायकवाड, युवासेना शहर अध्यक्ष बाळा श्रीखंडे, समाजसेवक रवि खिलनानी, उपशहरप्रमुख सुरेश सोनवणे, आदेश पाटील, विल्सन डिसोजा, तुषार बांदल, अमोल सरदार, विजय पवार, कैलास म्हात्रे तसेच पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्ते आणि उल्हासनगर कॅम्प-१ विभागातील महिला उपस्थित होत्या. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मोहम्मद अली चौक रस्त्याला वाहतूक कोंडीचे ग्रहण