रक्षाबंधन दिनी लाडक्या बहिणींचे झाले हाल
भिवंडी : घोडबंदर रस्ता दुरुस्तीसाठी ८ ऑगस्ट पासून १० ऑगस्ट पर्यंत बंद ठेवण्यात आल्याने यामुळे या मार्गावरील जड-अवजड वाहनांची वाहतूक चिंचोटी-विरार, शिरसाड फाटा-पारोळ मार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे ८ ऑगस्ट रोजी चिंचोटी ते अंजूर फाटा आणि शिरसाठ फाटा ते पारोळ मार्गे भिवंडी मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागला. तर ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण असल्याने लाडक्या बहिणी भावांकडे जाण्यासाठी निघाल्या असता बहिणींनाही या वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागला. याचा नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, या वाहतूक कोंडीमुळे रिक्षा चालकाने रस्त्यावर उतरुन प्रशासनाचा निषेध नोंदवला असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यानुषंगाने घोडबंदर रस्त्याची दयनीय दुरवस्था झाल्याने सदर रस्त्याचे काम १० ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्याचा अल्टिमेटम रस्ते प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला दिला आहे. त्यानुषंगाने सदर रस्ता जड- अवजड वाहनांना रहदारीकरिता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे रस्ता बंद झाल्याने या मार्गावरील वाहतूक मुख्य महामार्गाला जोडण्याकरिता वळती केली गेल्याने चिंचोटी- अंजूर फाटा, चिंचोटी-शिरसाड फाटा, शिरसाड-पारोळ, पारोळ- भिवंडी तसेच भिवंडी शहरातही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
त्यातच ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सण आणि जागतिक आदिवासी दिन एकाच दिवशी आल्याने लाडक्या बहिणींची वाट वाहतूक कोंडीने धरुन ठेवली होती. तर व्हायरल व्हिडिओनुसार रक्षाबंधन सणाच्या धर्तीवर संबंधित प्रशासनाने ठेकेदाराला ३ दिवसांत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी दिलेल्या अल्टिमेटमच्या निर्णयाविरोधात जूचंद्र येथील रिक्षा चालक मच्छिंद्र म्हात्रे यांनी प्रशासनाचा संताप व्यक्त करीत असताना ‘लाडक्या बहिणीचे झाले हाल, सरकारला राहिला ना ताल' अशा शब्दांत शासनाला खडेबोल सुनावले आहे. तसेच त्यांनी रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना सोबत घेवून चिंचोटी-अंजूर फाटा आणि भिवंडी-वाडा रस्त्यावरुन प्रवास करण्याचे आवाहन करुन रस्त्यांच्या दयनीय दुरवस्थेमुळे प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे.
दरम्यान, याच रस्त्यावर भजनलाल डेरी फॉर्म ते सागपाडा हद्दीत ट्रक पलटी झाल्याची घटनाही ९ ऑगस्ट रोजी दुपारी घडली होती. त्यामुळे काही वेळासाठी चिंचोटी-अंजूर फाटा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर दुपारनंतर काही प्रमाणात वाहतूक सुरळीत होण्यास सुरुवात झाली होती.