बीजमोदक रंगावलीतून पर्यावरण जपणुकीचा संदेश

नवी मुंबई : हाती घेतलेले कार्यक्रम, उपक्रम अभिनव संकल्पना राबवित सादर करण्याची नवी मुंबई महापालिकेची परंपरा ‘पर्यावरण दिन'च्या उपक्रमातही जपत महापालिका मुख्यालयात १००१ बीजमोदकातून आकर्षक पर्यावरणस्नेही रंगावली साकारलेली आहे.

आयकॉनिक इमारत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुख्यालय इमारतीच्या प्रवेशद्वारातून आत येताच समोरील पॅसेजमध्ये  लक्षवेधी रांगोळी सुप्रसिध्द रंगावलीकार श्रीहरी पवळे यांनी काढलेली असून या रांगोळीचे वैशिष्ट्य म्हणजे यात रांगोळी सोबत १००१ बीज मोदक अर्थात सीड बॉल वापरण्यात आलेले आहेत.

प्रभात ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून डॉ. प्रशांत थोरात यांच्या वतीने मागील काही वर्षांपासून ‘बीज मोदक' अभिनव उपक्रम राबविला जात असून यामध्ये विविध झाडांच्या बियांभोवती मातीचे लेपन करुन त्याला मोदकाचा आकार देऊन बीजमोदक तयार करण्यात आलेले आहेत. सदर बीजमोदक मोकळ्या जागी टाकले की त्यातील माती विरघळून बीज जमिनीत रुजते आणि त्यातून वृक्षरोप निर्मिती होते.

या अनुषंगाने ‘पर्यावरण दिन'चे औचित्य साधून महापालिका मुख्यालयात रंगावली साकारताना आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बीज मोदक रंगावलीची संकल्पना राबविण्यात आली.

यावर्षी संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमामार्फत ‘पर्यावरण दिन'ची ‘जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदुषणाचे निर्मुलन अशी संकल्पना जाहीर करण्यात आली असून या बीजमोदक रंगावलीच्या माध्यमातून वृक्षारोपण आणि संवर्धनाप्रमाणेच संकल्पनेस अनुसरुन ‘प्लास्टिक नाही वापरायचे, पर्यावरण वाचवायचं' असा संदेश प्रसारित करण्यात आलेला आहे.

या बीजमोदक रंगावलीसोबत अधिकारी, कर्मचारी यांच्याप्रमाणेच अनेक नागरिकांनीही सेल्फी छायाचित्रण काढत सोशल मिडीयावर पर्यावरण दिन साजरा केला. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दुर्गाडी किल्ला प्रकरण