सिडकोकडून उलवे येथील कत्तलखान्याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई  

नवी मुंबई : सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडुन अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा धडाका सुरुच असून सोमवारी सिडकोच्या पथकाने उलवे येथील बांधकाम सुरु असलेल्या कत्तलखान्याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करुन सदरचे अनधिकृत बांधकाम जमिनदोस्त केले.    

सिडकोच्या दक्षता विभागासोबत अतिक्रमण विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुरेश मेंगडे यांनी सिडकोच्या जागेवर उभ्या राहिलेल्या अनधिकृत बांधकामावर धडक कारवाईला सुरुवात केली आहे. उलवे नोड मधिल सर्व्हे क्रमांक 296,297 भुखंड क्रमांक 339, सेकटर-19 येथे सिडकोची परवानगी न घेता सुमारे 25 चौरस मीटरचे पक्के बांधकाम करून त्याठिकाणी अनधिकृत कत्तलखाना सुरू करण्यात आला होता. त्यामुळे सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने या अनधिकृत बांधकामाला नोटीस बजावली होती.    

मात्र त्यानंतर देखील सदर ठिकाणी अनधिकृतपणे इमारतीचे बांधकाम सुरुच ठेवण्यात आले होते. त्यामुळे सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण पथकाने या अनधिकृत बांधकामावर कारवाई करुन सदरचे बांधकाम जमीनदोस्त केले. सदर बांधकाम सिडकोच्या प्रचलित नियमावली व धोरणांचा भंग करुन सिडकोची कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी न घेता उभारण्यात आल्याने त्याविरोधात कारवाई करण्यात आली असल्याचे सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांनी सांगितले.  

सदरची मोहीम मुख्य दक्षता अधिकारी यांच्या निर्देशानुसार व मुख्य नियंत्रक, अनधिकृत बांधकामे (नवी मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाचे अधिकारी व पोलीस कर्मचारी, सिडको पोलीस पथक सिडकोचे सुरक्षा रक्षक यांच्या सहभागाने यशस्वीपणे राबविण्यात आली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महिला दिनी योग शिबिरातून महिलांना प्रशिक्षण