२६ हजार घरांच्या किंमती कमी व्हाव्या यासाठी सिडको सोडत धारकांचा सिडको विरुद्ध एल्गार
घरांचे दर कमी नाही झाले तर पुढील आठवड्यात मनसेचा इंजेक्शन मोर्चा... गजानन काळे यांचा इशारा
नवी मुंबई : ऑक्टोबर २०२४ मध्ये सिडकोने नवी मुंबई परिसरात २६ हजार घरांची लॉटरी जाहीर केली. जाहिरातीत ही घरे पंतप्रधान आवास योजने अंतर्गत सांगून घरांच्या किंमती सर्व सामन्यांच्या आवाक्या बाहेर ठेवल्या आहेत. याला विरोध म्हणून मनसे प्रवक्ते व नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली २५ मार्च रोजी वाशी येथे मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. हजारोंच्या संख्येने सिडको सोडतधारक मानवी साखळी आंदोलनात सहभागी झाले.
वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास वंदन करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सिडकोच्या प्रतिमेस लोखंडी साखळदंडाने बांधून प्रतिकात्मक निषेध करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अरेंजा कॉर्नर असा पायी मोर्चा काढण्यात आला. नंतर अरेंजा कॉर्नर येथे सिडको सोडतधारकांनी भव्य मानवी साखळी उभी करून सिडको चा निषेध केला. "कमी करा कमी करा, सिडकोच्या घरांची किंमत कमी करा", माझ्या पसंतीचे सिडकोचे घर, जाहिरात केली दुनियाभर", "तुम्ही म्हणता नवी मुंबईचे प्रवेशद्वार, किंमत पाहून झाले सर्व गप्पगार", "आमच्या स्वप्नातील घर, घेईल परवडणार असेल तर, "लढा सिडकोच्या घरांचा, घ्येय किंमत कमी करण्याचा, "स्वस्त घरांची दाखवली आशा, किंमती वाढवून केली निराशा", "गरिबांच्या स्वप्नाचा केला चुराडा, येतोय आम्ही सिडको वर करण्या राडा" अशा घोषणांचे फलक हातामध्ये पकडून महिला, पुरुष, ज्येष्ठ सिडको सोडत धारकांनी सिडको प्रशासनाचा निषेध केला. भर उन्हात हजारोंच्या संख्येने साखळी आंदोलनात सहभागी होऊन सिडको सोडत धारकांनी मुजोर सिडको विरुद्ध एल्गार पुकारला.
सिडको ने दर जाहीर करण्या पूर्वी १ लाख ५२ हजार अर्ज आलेला असताना दर जाहीर झाल्या नंतर फक्त २२ हजार अर्ज उरलेत. त्यातील पण जवळपास ६-७ हजार सोडतधारकांना घरे जबरदस्ती माथी मारली आहेत. सिडकोने ७०० कोटी खर्च करून ज्या मार्केटिंग कंपनीशी करार केला होता ते पैसे घरांच्या किंमती कमी करण्यासाठी वापरले असते तर गोर गरिबांचे आशीर्वाद मिळाले असते अशी भावना काही सिडको सोडतधारकांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे सिडकोने जाहिरात करताना ३२२ चौ फुटाचे घर सांगून प्रत्यक्षात २९० चौ फुटाचे घर देऊन सर्व सामान्य सिडको सोडत धारकांची फसवणूक केली आहे. सिडकोने या घरांचे दर ठरवताना अनेक पातळीवर सर्वसामान्यांची व केंद्र सरकारची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला. केंद्र सरकारने सप्टेंबर २०२४ मध्ये पंतप्रधान आवास योजनेची मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार आर्थिक दृष्ट्या दुर्बल (EWS) घटकांची उत्पन्न मर्यादा ३ लाख पेक्षा कमी तर अल्प उत्पन्न गट (LIG) या घटकाची मर्यादा ३ लाख ते ६ लाख असायला हवी. हे नियम नरेंद्र मोदींच्या गुजरात मधील अहमदाबाद मध्ये पाळले जातात, मग नवी मुंबई याला अपवाद का ? त्याच प्रमाणे विधानसभा निवडणुकी पूर्वी सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी आश्वासन दिले होते की घरांच्या किंमती २०% ते २५% नी कमी होतील. या घोषणेचा ही मंत्री महोदयांना विसर पडल्याचे दिसून येते. कुर्ला मध्ये म्हाडा जवळपास ५०० चौ फुटाचे घर ५० लाखाला देत असताना सिडको नवी मुंबईत ३०० चौ फुटाचे घर ८० लाखाला का देत आहे ? असा सवाल उपस्थित करत ही सर्व सामान्यांची घोर फसवणूक आहे असा आरोप गजानन काळे यांनी सिडको प्रशासनावर केला.
पुढील निर्णय होईपर्यंत सिडकोने पैसे भरायची प्रक्रिया थांबवावी अशी मागणी सुद्धा या आंदोलनावेळी सिडको प्रशासनाला केली. येत्या काही दिवसांत सिडको प्रशासनाला सोडतधारकां तर्फे पोस्ट कार्ड पाठवण्याची मोहीम सुरू करणार. तसेच आवश्यकता पडल्यास सिडको सोडत धारक 'जेल भरो' आंदोलन करतील अशी माहिती गजानन काळे यांनी दिली. या मोहिमेत सिडको सोडतधारक आपल्या भावना प्रशासनाला व सरकारला कळवतील. तसेच येत्या काही दिवसात जर घरांचे दर कमी नाही झाले तर सिडको भवन वर भव्य 'इंजेक्शन मोर्चा' काढण्यात येईल अशी घोषणा गजानन काळे यांनी आज केली.
या मोर्चात मनसे उपशहरअध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, महिला सेना शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, उप शहर अध्यक्ष अनिथा नायडू, शहर सचिव यशोदा खेडसकर, विभाग अध्यक्ष अभिलेश दंडवते, सागर विचारे, शाम ढमाले, विकास पाटील, अक्षय भोसले, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, रोजगार शहर संघटक सनप्रीत तुर्मेकर, चित्रपट सेना शहर संघटक अनिकेत पाटील, संजय शिर्के, कृष्णा कांबळे, संतोष मोटे, महिला सेना विभाग अध्यक्ष संगीता वंजारी, विद्या इनामदार, नंदा मोरे व सिडको सोडतधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.