डीपीएस शाळा मुख्याध्यापकांची पदावरुन तात्काळ हकालपट्टी करा; ‘पालक-मनसे'च्या शिष्टमंडळाची शिक्षण उपसंचालकांकडे मागणी उपसंचालकांकडे मागणी
नवी मुंबई : सीवुडस् मधील डीपीएस शाळेतील ४ वर्षाच्या विद्यार्थ्यावर स्कुल बस चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना ५ दिवसांपूर्वी उघडकीस आली आहे. या घटनेबाबत ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना'च्या शिष्टमंडळाने शाळेच्या पालक प्रतिनिधींसोबत चर्नीरोड, मुंबई येथे विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांची भेट घेत निवेदन दिले. यावेळी शिष्टमंडळात ‘मनसे विद्यार्थी सेना'चे नवी मुंबई शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, मनसे शहर सचिव सचिन कदम, ‘विद्यार्थी सेना'चे उपशहर अध्यक्ष प्रतिक खेडकर, शेटे, शहर सहसचिव विपुल पाटील, मधुर कोळी, विभाग अध्यक्ष प्रद्युमन हेगडे, उपविभाग अध्यक्ष मयंक घोरपडे, शाळेचे पालक प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्याच्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पालकांच्यातक्रारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत निष्काळजीपणा दाखवणारे तसेच विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या सोबत गैरवर्तन करणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापकांच्या तक्रारींचा पाढा पालक प्रतिनिधींनी शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांच्या पुढे वाचून दाखवला. विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचाराच्या या घटनेमुळे विद्यार्थ्यांसह पालक वर्गात मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण असल्याचे यावेळी पालक प्रतिनिधींकडून सांगण्यात आले. त्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापकांची तात्काळ मुख्याध्यापक पदावरुन हकालपट्टी करून या प्रकरणात चौकशी समिती नेमून शाळेवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी शिष्टमंडळाकडून करण्यात आली.
मुख्याध्यापक हरीशंकर वशिष्ठ यांच्यावर बेलापूर कोर्टात ३ केस महिला शिक्षकांनी असल्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे मुख्याध्यापक डीपीएस, बुलंदशहर मध्ये असताना त्यांच्यावर असेच अनेक गंभीर आरोप महिला शिक्षिका आणि इतर महिला कर्मचाऱ्यांनी केल्याची माहिती सुध्दा यावेळी उपसंचालक संगवे यांना देण्यात आली. असा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती मुख्याध्यापक पदावर कसा काय असू शकतो?असा प्रश्न पालकांनी उपसंचालकांना विचारला. यावर शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी लवकरच कठोर कारवाई करु, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
दरम्यान, शिक्षण विभागाने जर तात्काळ कारवाई केली नाही तर मनसे तीव्र आंदोलन करेल, असा इशारा यावेळी शिष्टमंडळाने दिला.