सिडको च्या २६ हजार घरांच्या किंमती कमी कराव्या यासाठी मनसेची आरपारची लढाई
वाशी ते ठाणे एकनाथ शिंदे यांचा बंगला असा पायी "दिंडी मोर्चा"
नवी मुंबई : सिडकोने २६ हजार घरांच्या सोडतीतील घरे अत्यंत महाग असल्याने या किंमती कराव्या म्हणून सिडको सोडतधारकांनी मनसे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मागील तीन महिन्यांपासून आंदोलन सुरु केले आहे. तरी राज्य सरकार व सिडको किंमती कमी करण्याच्या तयारीत दिसत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषया संदर्भात भेट दोनवेळा सह्याद्री अतिथीगृहात आयोजित केली होती. परंतु,दोन्ही बैठका रद्द केल्या. सिडको सोडतधारक हे एकनाथ शिंदे यांच्या सातारा येथील दरे गावी जाऊन आले. तिथे भेटल्यानंतर ना. शिंदे यांनी घर विक्रीची प्रक्रिया थांबवण्याचे आदेश सिडको व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना दिले. पण, विजय सिंघल यांनी यावर कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे सिडको सोडतधारकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
म्हाडा जवळपास ५०० चौ फुटाचे घर कुर्ला येथे साधारण ५० लाखाला विकत आहे. तर सिडको केवळ २९१ चौ. फुटाचे घर वाशी मध्ये ८६ लाखाला तर खारघर, कळंबोली येथे साधारण ५० लाखाला विकत आहे. म्हाडा ची घरे सिडको पेक्षा तुलनेने कमी असून सुद्धा घरांच्या किंमती कमी व्हाव्यात म्हणून म्हाडाने समिती गठीत केली आहे. परंतु सिडको असा कोणताही निर्णय घेत नाही हे फक्त नवी मुंबईकरांचे दुर्दैव नाही तर इथल्या लाचार लोक प्रतिनिधी यांचे सुद्धा अपयश आहे, असा घणाघात गजानन काळे यांनी केला.
उपमुख्यमंत्र्यांना नवी मुंबईतील १३ नगरसेवकांचा पक्ष प्रवेश घ्यायला वेळ आहे. परंतु, २६ हजार सर्वसामान्य कुटुंबाच्या प्रश्नासाठी भेटायला वेळ नाही असा आरोप गजानन काळे यांनी वाशी येथे पत्रकार परिषद घेवून केला. अनेकदा विनंती, आंदोलने करून सुद्धा सरकार दरबारी न्याय मिळत नसेल तर आंदोलन तीव्र करण्या शिवाय पर्याय नसल्याची भावना व्यक्त करण्यात आली. येत्या ८ मे २०२५ रोजी भर उन्हात वाशी, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते ठाणे, एकनाथ शिंदे यांचा बंगला असा पायी मोर्चा काढण्याची घोषणा गजानन काळे यांनी केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना गुरु मानणारे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या तालमीत वाढलेले तसेच सर्व सामान्यांचे नेते अशी बिरूदावली मिरवणारे ना. एकनाथ शिंदे ३-३ महिने प्रश्न सोडवत नाहीत. त्यामुळे एकनाथांच्या भेटीसाठी सर्व सिडको सोडत धारक भर उन्हात पायी टाळ मृदूंगाच्या गजरात दिंडी मोर्चा काढणार आहेत. जर एकनाथ शिंदे यांनी प्रश्न सोडवला नाही तर पुढील आठवड्यात मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगल्यावर धडक द्यायला सिडको सोडतधारक कमी करणार नाहीत, असा इशारा गजानन काळे यांनी दिला. या पायी दिंडी मोर्चा साठी सर्व सिडको सोडत धारक आपल्या कुटुंबाला घेवून गुरुवारी ८ मे रोजी सकाळी ७ वाजता वाशी, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जमणार आहेत. तरी नवी मुंबईकरांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा देऊन सहभाग नोंदवावा असे आवाहन सिडको सोडतधारकांनी केले आहे.
सदर पत्रकार परिषदेत महिला सेना शहरअध्यक्ष डॉ. सौ. आरती धुमाळ, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, महिला सेना उपशहरअध्यक्ष सौ. दिपाली ढवूळ व सिडको सोडत धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.