धार्मिक विधीचा मार्ग बंद केल्याने नवी मुंबईकरांमध्ये संताप
नवी मुंबई : बेलापूर, सेक्टर-१५ रेती बंदर या ठिकाणी नवी मुंबई मधील नागरिक दशक्रिया आणि इतर धार्मिक विधीसाठी येत असतात. मात्र, खासगी कंपनीने या भागात पत्रे ठोकून नागरिकांच्या येण्या-जाण्याचा पूर्वीपासूनचा एकमेव मार्ग अडवल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. पत्र्याचे कुंपण उभारल्यामुळे नवी मुंबईतील नागरिकांना दशक्रिया विधी आणि इतर धार्मिक विधी करताना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जनतेच्या श्रध्देशी निगडीत सदर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत आमदार मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, विकास जनतेच्या श्रध्दा आणि परंपरांचा आदर राखूनच व्हायला हवा. बेलापूर जेट्टीवरील नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, असेही आ. मंदाताई म्हात्रे यांनी स्पष्ट केले.
बेलापूर, सेक्टर-१५ येथील जेट्टी परिसरातील भूखंड खाजगी कंपनीला ३० वर्षांच्या भाडेतत्वावर देण्यात आल्याचे समजत असून, सदर कंपनीकडून त्या ठिकाणी पत्र्याचे कुंपण लावण्यात आले आहे. या पत्र्याच्या कुंपणामुळे स्थानिक नागरिकांना दशक्रिया विधी, इतर धार्मिक आणि अध्यात्मिक कार्य करण्याकरिता असलेला पूर्वीपासूनचा एकमेव मार्ग बंद झाला आहे. या अनागोंदीमुळे केवळ बेलापूर गावातीलच नव्हे तर संपूर्ण नवी मुंबईतील नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी, नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीचा आणि आक्रोशाचा सूर उमटू लागला आहे.
दशक्रिया विधी आणि धार्मिक कार्यक्रमांसारख्या अत्यंत संवेदनशील बाबींवर अडथळा निर्माण करणे नागरिकांच्या श्रध्दा आणि भावनांशी सरळसरळ छेडछाड करणारा प्रकार आहे. श्रध्दा, संस्कार आणि परंपरेशी थेट छेडछाड करणारा सदर प्रकार पूर्णपणे असंवेदनशील आणि जनतेच्या भावनांचा अपमान करणारा आहे, अशा शब्दात आ. मंदाताई म्हात्रे यांनी त्यांची भावना मांडली आहे. स्थानिकांच्या धार्मिक हक्कांवर गदा आणणाऱ्या या प्रकाराविरोधात ग्रामस्थांमध्ये प्रचंड आक्रोश असून, नागरिकांचा उद्रेक रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. अन्यथा नागरिकांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन उभारावे लागेल, असा इशाराही आमदार म्हात्रे यांनी दिला आहे.
बेलापूर, सेक्टर-१५ रेती बंदर परिसरातील पत्रा कुंपण तात्काळ हटविण्याची कार्यवाही करण्याचे आदेश सबंधित अधिकाऱ्यानां देण्यात यावेत. नागरिकांना पारंपरिक आणि धार्मिक कार्य निर्विघ्नंरित्या करण्यास सक्षम व्हावे यासाठी परिसर खुला ठेवण्यात यावा. तसे न झाल्यास नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होऊन ते आंदोलन करण्यास प्रवृत्त होतील आणि त्याने होणाऱ्या सर्व परिणामांना सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील, असेही आ. मंदाताई म्हात्रे यांनी म्हटले आहे.