नमुंमपा दिंडी स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धेची १५ सप्टेंबर रोजी अंतिम फेरी

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विविध कला, क्रीडा-सांस्कृतिक स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करुन नागरिकांच्या कलागुणांना, खेळांना प्रोत्साहन देण्याचा सदैव प्रयत्न राहिलेला आहे. नवी मुंबई कार्यक्षेत्रातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार नवी मुंबई महापालिका क्रीडा-सांस्कृतिक विभागामार्फत ‘आंतरशालेय दिंडी स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धा २०२५-२६'चे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धांची प्राथमिक फेरी नुकतीच विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे १० सप्टेंबर रोजी अत्यंत उत्साहात पार पडली. यामधील एकपात्री अभिनय स्पर्धेत नमुंमपा कार्यक्षेत्रातील शाळांमधील ७५ विद्यार्थ्यांनी आणि दिंडी स्पर्धेमध्ये नमुंमपा कार्यक्षेत्रातील शाळांमधील तब्बल १३५० हून अधिक विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा' पंधरवड्याला राष्ट्रीय पातळीवर सुरुवात होत असून सुपर स्वच्छ लीग मानांकित नवी मुंबई शहराने या अभियानात पुढाकार घेत या दोन्ही स्पर्धांमध्ये स्वच्छता आणि पर्यावरणाविषयी जागरुकतेला प्राधान्या देत तशा प्रकारचे विषय दिलेले आहेत. त्यामध्ये एकल वापराचे प्लास्टिक-कचरा प्रबंधन, कचरा व्यवस्थापन आणि पुनर्वापर, स्वच्छता अपनाओ-बिमारी भगाओ, व्यसनमुक्ती आणि आरोग्य, मोबाईल शास्त्र की शस्त्र? असे विषय देण्यात आले होते. या विषयांवर विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने प्रभावी सादरीकरण करीत सर्जनशीलता आणि सामाजिक जाणीव यांची उत्तम सांगड अभिनयातून प्रकट केली.

दिंडी स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे परीक्षण सुप्रसिध्द अभिनेते अधोक्षज कऱ्हाडे आणि एकपात्री अभिनय स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे परीक्षण लेखक, दिग्दर्शक सिद्धांत जाधव यांनी केले. परीक्षकांनी सहभागी सर्व सादरीकरणांचे अवलोकन करुन निकाल देलेला असून त्यानुसार दिंडी स्पर्धेकरिता १४ शाळांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे. तसेच एकपात्री अभिनय स्पर्धेसाठी १७ स्पर्धक शाळांची निवड करण्यात आलेली आहे.

या स्पर्धांची अंतिम फेरी आणि पारितोषिक वितरण समारंभ १५ सप्टेंबर रोजी, विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे सकाळी ११ वाजता भव्यदिव्य स्वरुपात सुरु होणार आहे. अंतिम फेरीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांकडून अधिक दर्जेदार आणि प्रभावी सादरीकरणाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सदर स्पर्धेला पालक, शिक्षक तसेच नागरिकांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. नवी मुंबई महापालिकेच्या अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळत असल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.

दरम्यान, दिंडी स्पर्धा आणि एकपात्री अभिनय स्पर्धांच्या अंतिम फेरी, पारितोषिक वितरण समारंभाकरिता नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन नवी मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली