खारघर मध्ये मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव
खारघर : खारघर सेक्टर-१० परिसरात मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाने रहिवाशी त्रस्त झाले असून, पनवेल महापालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
खारघर सेक्टर-१० मधील रंजीत जोगी १८ मे रोजी सकाळी सायकलिंग करण्याकरिता गेले असता कस्तुरी इमारत समोरील पदपथावर पाठीमागून आलेल्या एका मोकाट कुत्र्याने डाव्या पायाला चावा घेतल्याने रंजीत जोगी यांना दुखापत झाली आहे.
खारघर सेक्टर-१० मधील रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांची टोळी फिरत असल्याचे चित्र नेहमीच दिसते. मोकाट कुत्र्यांच्या भीतीपोटी लहान मुले-मुलींना सोसायटी बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. कोपरा गाव आणि वसाहत मिळून खारघर सेक्टर-१० परिसर ओळखला जातो. कोपरा गावातही मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. कोपरा परिसरात रात्री रस्ते आणि पदपथावर वडापाव, चायनीज आदी खाद्यपदार्थांच्या हातगाड्या असतात. खाद्यपदार्थ विक्रेते रात्री शिल्लक राहिलेले पदार्थ रस्ते आणि पदनपथावर टाकून जात असतात.
त्यामुळे मोकाट कुत्र्यांना खाद्यपदार्थ उपलब्ध होत असल्यामुळे खारघर सेक्टर-१० मध्ये मोकाट कुत्र्यांच्या संख्येत वाढ होत आहे, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. खारघर सेक्टर-१० मधील मोकाट कुत्र्यांचा पनवेल महापालिका प्रशासनाने बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशी करीत आहेत.