पावसाळ्यातील दक्षतेसह स्वच्छता, आरोग्य, शाळाप्रारंभ, ऑनलाईन सेवांचा आढावा

नवी मुंबई : अंतिम टप्प्यातील पावसाळी कामे युध्द पातळीवर पूर्ण करावीत तसेच रस्त्यांवर विविध कामांसाठी केलेले खड्डे बुजविल्यानंतर त्याचे पुनर्पृष्ठीकरण झाले असल्याची सर्व ठिकाणी खातरजमा करुन घ्यावी. स्ट्रॉम वॉटर ड्रेनच्या वॉटर एन्ट्री चोकअप होणार नाहीत, याकडे नियमितपणे काटेकोरपणे लक्ष देण्याचेे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले. भरतीची वेळ आणि अतिवृष्टी जुळून आल्यास ज्याठिकाणी पाणी साचू शकते अशा सखल भागाकडे अधिक बारकाईने लक्ष द्यावे आणि त्याठिकाणी जास्तीचे पाणी उपसा पंप व्यवस्था करावी. तसेच होल्डींग पाँड आणि पंपींग हाऊसच्या ठिकाणीही अतिरिक्त पंप व्यवस्था तसेच जनरेटर व्यवस्था करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

नमुंमपा विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत पावसाळी कामे आणि इतर महत्वाच्या बाबींचा महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आढावा घेतला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व डॉ. राहुल गेठे, प्रशासन विभागाचे उपायुक्त शरद पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड, मुख्य लेखा-वित्त अधिकारी सत्यवान उबाळे तसेच इतर विभागप्रमुख, विभाग अधिकारी तथा सहा आयुक्त, कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

वृक्ष छाटणी केल्यानंतर पडणारा हरित कचरा लगेच उचलण्याबाबत यंत्रणा तत्पर ठेवावी. तसेच सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेवर अधिक बारकाईने लक्ष द्यावे असेही निर्देश आयुक्तांनी दिले.

नवी मुंबई महापालिकेने दोन्ही परिमंडळासाठी स्थापन केलेले स्वतंत्र आपत्कालीन प्रतिसाद दल मदत कार्यासाठी सज्ज राहण्याच्या दृष्टीने प्रमाण मानक कार्यप्रणाली तयार करावी आणि त्यांना कृतीशील करावे. अग्निशमन यंत्रणा कार्यतत्पर ठेवावी आणि उपलब्ध साहित्य, उपकरणे यांची चाचणी करून घ्यावी. तसेच महापालिका क्षेत्रातील सिडको, रेल्वे, एमआयडीसी, पीडब्ल्यूडी, एमएसईडीसीएल अशा विविध प्राधिकरणांशी परस्पर समन्वय ठेवून नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले.

पाऊस पडत असताना सध्या २-३ दिवसांचा खंड पडतो आहे. त्यामुळे असे ऊन आणिपावसाच्या कालावधीचे वातावरण डासांच्या उत्पत्तीला पोषक असून त्या अनुषंगाने डास प्रतिबंधात्मक कार्यवाहीवर अधिक भर द्यावा. लोकवस्तीच्या भागात धुरीकरणाचे प्रमाण वाढवावे तसेच नागरिकांच्या दुलर्कषामुळे एखाद्या घरात डास आळ्या निर्मिती झालेली आढळल्यास सामाजिक आरोग्याला विघातक बाबीबद्दल दंडात्मक कार्यवाही करण्याची खातरजमा करुन घ्यावी अशाही सूचना आयुक्तांनी केल्या.

मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतील १५० दिवसांचा कार्यक्रम यामध्ये ई-गव्हर्नन्स कृती आराखडा करुन त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने तत्पर कार्यवाही करावी. या अंतर्गत व्हॉटस्‌ॲप आधारीत सेवा पुर्ततेकडे लक्ष देऊन एआय बेस्ड चॅटबोट, ब्लॉक चेन, डिजी लॉकर अशा अत्याधुनिक तंत्रप्रणालींचा कार्यालयीन वापर करण्याच्या दृष्टीने जलद कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

१६ जून पासून शाळा सुरु होत असून महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये शाळा प्रवेश दिन साजरा करण्यात यावा असे निर्देशित करतांनाच विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्षात उत्साहाने स्वागत करावे तसेच त्यांना त्याच दिवशी युनिफॉर्म, पुस्तके उपलब्ध होतील याचे नियोजन करुन काटेकोर अंमलबजावणी करावीत, असे निर्देश आयुक्तांनी दिले.

न्यायालयाच्या निर्णयानुसार अनधिकृत बांधकामांची यादी विहित कालावधीत प्रसिध्द करण्यात यावी तसेच प्रतिज्ञापत्रात दर्शाविलेल्या अनधिकृत बांधकामांची तपशीलवार यादी तयार करुन छायाचित्रांसह माहिती तयार करावी. अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाई नियमानुसार काटेकोरपणे करण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले.

पावसाळी कालावधीच्या दृष्टीने धोकादायक इमारतींची यादी नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी विविध माध्यमांतून प्रसिध्दी देण्यात यावी तसेच सी-१ कॅटेगरीतील अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्याची कार्यवाही विनाविलंब करण्यात यावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले. अतिक्रमण विभागाचे पोर्टल असावे आणि त्यामध्ये माहिती अद्ययावत ठेवण्यात यावी अशाही सूचना आयुक्तांमार्फत देण्यात आल्या.

नागरिकांना सुलभ सेवा उपलब्ध करुन देणे आपले कर्तव्य असून त्यासाठी सर्वांनी तत्पर रहावे. त्यासोबतच महापालिकेच्या मालमत्तांचा गैरवापर केला जाणार नाही, याबाबतही दक्ष रहावे.
-डॉ.कैलास शिंदे, आयुक्त-नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

पूर्वीचे स्थगिती तर आताचे प्रगती सरकार! - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे