खा. सुरेश म्हात्रे यांच्याकडून उपजिल्हा रुग्णालयातील समस्या पाहणी
भिवंडी: शहरातील स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांसोबतच नव्याने उभारण्यात येत असलेल्या २०० खाटांच्या माता-बाल संगोपन रुग्णालयाला खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी भेट देऊन येथील रुग्णालयाच्या कामाचा आढावा घेतला. तसेच कामाची जबाबदारी झटकणाऱ्या अधिकाऱ्यांनाही त्यांनी धारेवर धरले आहे.
खासदार म्हात्रे यांच्या या पाहणी प्रसंगी महापालिका आयुक्त अनमोल सागर, रुग्णालय अधीक्षका डॉ. माधवी पंदारे, कार्यकारी अभियंता जमील पटेल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता दत्तू गीते, सहाय्यक कार्यकारी अभियंता सचिन नाईक, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता संदीप पटनावर, आदि अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नव्याने नवजात बालक गरोदर माता यांच्यासाठी २०० बेडस्चे स्वतंत्र रुग्णालय बनविले जात आहे. सदर काम संथ गतीने सुरु आहे. यासोबतच स्व.इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयाची ड्रेनेज व्यवस्था नादुरुस्त झाल्याने अनेक वेळा रुग्णालयातील स्वच्छतागृह आणि शौचालयात सांडपाणी तुंबण्याची समस्या उद्भवत आहे. याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर खासदार सुरेश म्हात्रे यांनी याठिकाणी भेटी देत रुग्णालयाचे बांधकाम वेळेत पूर्ण करण्यासाठी विभागाने आणि ठेकेदाराने काम करण्यासंदर्भात योग्य सूचना दिल्या. तसेव स्व.इंदिरा गांधी रुग्णालयातील ड्रेनेज बाबत ३ महिन्यांपूर्वी तक्रार होऊन देखील महापालिकेने गांभिर्याने सदर समस्या सोडवणुकीसाठी पाऊले उचलली नाहीत, याचा जाब विचारत खासदार म्हात्रे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
भिवंडी मधील उपजिल्हा रुग्णालयावर भिवंडी शहर आणि ग्रामीण मधील १५ लाख नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी आहे. त्याअनुषंगाने शासनाकडून गरजेच्या ठिकाणी काम करण्याची गरज असताना, अनावश्यक ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात, अशी खंत खासदार सुरेश म्हात्रे यांनी यावेळी व्यक्त केली.