उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पोलीस परेड मैदानावर ध्वजवंदन
ठाणे : देशात आज महाराष्ट्र अनेक आघाड्यांवर नंबर वन आहे. महाराष्ट्राने आर्थिक, सामाजिक, औद्योगिक क्षेत्रात मुसंडी मारली. देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे. महाराष्ट्राच्या विकासात मुंबईचे मोठे योगदान आहे. पण, मुंबई म्हणजे केवळ मुंबई नाही तर मुंबईपासून ठाणे आणि पुढे रायगडपर्यंत सगळे महानगर क्षेत्र सुध्दा यामध्ये येते. आज महाराष्ट्र दिनी पुन्हा एकदा राज्याच्या प्रगतीचा, भरीव विकास आणि कल्याणकारी योजनांचा संकल्प आपण करत आहोत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजवंदन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे मधील पोलीस क्रीडा संकुल येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, पोलीस सह-आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पंजाबराव उगले, संजय जाधव, विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त पराग मनेरे, मीना मकवाना, पंकज शिरसाट, डॉ.श्रीकांत परोपकारी, शशिकांत बोराटे, सुभाष बुरसे, डॉ.मोहन दहीकर, अमरसिंह जाधव, प्रशांत कदम, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, प्र.उपजिल्हाधिकारी (सर्वसाधारण) सचिन चौधर, उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, उमेदच्या प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, आदिंसह जिल्हा प्रशासनातील इतर अधिकारी-कर्मचारी, पोलीस विभागाचे अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.
ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काही आव्हाने सुध्दा मला दिसतात. जिल्ह्यातील पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी काळू धरण कालमर्यादेत पूर्ण करावे, असे निर्देश मी दिले आहेत. ठाणे जिल्ह्याच्या चौफेर प्रगती आणि सर्वांगीण सामाजिक विकासासाठी आपले महाराष्ट्र सरकार कटीबध्द आहे, असे ना. शिंदे म्हणाले.
यावेळी विविध शासकीय विभागांच्या उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी विविध पथकांनी संचलनाद्वारे मान्यवरांना मानवंदना दिली. तसेच शीघ्र प्रतिसाद रुग्णवाहिकांचे लोकार्पणही नामदार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या दिमाखदार सोहळ्याचे सूत्रसंचलन वैद्यकीय अधिकारी डॉ. तरुलता धनके यांनी केले.