नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणस्थळी जलपूजन संपन्न
नवी मुंबई : स्वातंत्र्योत्तर कालखंडानंतर स्वत:च्या मालकीचे धरण असणारी नवी मुंबई एकमेव महापालिका असून मोरबे धरणामुळे नवी मुंबईची ओळख जलसंपन्न महापालिका अशी आहे. पाताळगंगा नदीची उपनदी असलेल्या धावरी नदीवर खालापूर तालुक्यात असलेले 450 द.ल.लि. प्रतिदिन क्षमतेचे मोरबे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून वनेमंत्री ना. गणेश नाईक यांच्या शुभहस्ते, महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोरबे धरणाचे जलपूजन पारंपारिक पद्धतीने संपन्न झाले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार व डॉ.राहुल गेठे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे आणि इतर विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते. तसेच माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी नगरसेवक डॉ.जयाजी नाथ, अनंत सुतार, रवींद्र इथापे, रामचंद्र घरत, दशरथ भगत, नेत्रा शिर्के व इतर मान्यवर उपस्थित होते.
सध्या ग्लोबल वॉर्मिंगचा व वातावरण बदलाचा धोका लक्षात घेऊन पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने जागरूकतेने गतिमान पावले उचलण्याची गरज विशद करीत ना. गणेश नाईक यांनी 5 वर्षाच्या काळात राज्यभरात 250 कोटी वृक्षारोपणाच्या दृष्टीने नियोजनबद्ध पावले उचलली जात असल्याचे सांगितले. स्वत:च्या मालकीचे धरण असणारी स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडातली नवी मुंबई एकमेव महापालिका असून आगामी काळातील वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी इतर जलस्त्रोतांचे नियोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. मोरबे धरण प्रकल्पानजिकच्या जागेत मनोरंजन केंद्र विकसित करणे तसेच सोलार पॅनलद्वारे ऊर्जा निर्माण करणे या माध्यमातून नवी मुंबई महापालिकेस उत्पन्नाचे स्त्रोत प्राप्त होतील, असेही ते म्हणाले. मोरबे धरणातील जलसाठा शुद्ध राहील यादृष्टीने तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
नमुंमपा आयुक्तडॉ. कैलास शिंदे यांनी मोरबे धरण यावर्षी ऑगस्ट महिन्यातच पूर्ण भरले असून ही निसर्गाची कृपा असून नवी मुंबईकरांसाठी आनंदाची गोष्ट असल्याचे मत व्यक्त केले. नवी मुंबईकरांना स्वच्छ, शुध्द व पुरेसा पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने महापालिकेने जल वितरणाचे नियोजन केले असल्याची माहिती देत आयुक्तांनी सन 2055 पर्यंत 40 ते 45 लाख लोकसंख्या होईल हे लक्षात घेऊन पाताळगंगा, पोशीर व शिलार या धरणांतून पाणीसाठा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे पारसिक हिल बेलापूर ते महापे जंक्शन पर्यंत 15 कि.मी. जलवाहिन्यांचे काम नियोजित असून त्याव्दारे मोरबे धरणाचा पाणीपुरवठा संपूर्ण महापालिका क्षेत्रात सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले. जलस्त्रोतांची शाश्वतता वाढवली पाहिजे यादृष्टीने पिण्याव्यतिरिक्त वापरासाठी पुनर्प्रक्रियाकृत पाणी पुरवण्याची अंमलबजावणी सुरू असल्याचे सांगत त्यांनी पिण्याच्या पाण्याचा उपयोग नागरिकांनी पाण्याचे महत्व ओळखून काटकसरीने करावा, असेही आवाहन त्यांनी केले.
अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले.
मोरबे धरण क्षेत्रात आजतागायत 3901 मिमी पावसाची नोंद झालेली असून पाण्याची पातळी पूर्ण 88 मीटरपेक्षा जास्त झालेली आहे. धरणात 190.89 द.ल.घ.मी. इतका जलसाठा असून त्यामधील पाण्याचा आज धरणाचे दरवाजे 25 सेमीने उघडून विसर्ग करण्यात आला.
अशाचप्रकारे प्रत्येक वर्षी मोरबे धरणातील जलसाठा पूर्ण भरावा अशी प्रार्थना करीत परंपरेनुसार जलपूजन संपन्न झाले. मोरबे धरणामध्ये मुबलक पाणी साठा उपलब्ध असला तरी सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचे महत्व ओळखून पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही करण्यात येत आहे.