जे.व्ही.एम. मेहता महाविद्यालयात रंगला ‘गर्जते मराठी' सोहळा
नवी मुंबई : ऐरोली येथील जे.व्ही.एम.मेहता महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त ‘गर्जते मराठी' हा मराठी साहित्याचे व संस्कृतीचे दर्शन घडविणारा कार्यक्रम पार पडला. कार्मक्रमाच्या सुरुवातीला मराठी भाषा आणि वाड्मय मंडळ प्रमुख सौ. मंगल कातकर यांनी मान्यवरांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना मराठी भाषादिनाचे महत्त्व सांगितले व वाड्मय मंडळाची भूमिका स्पष्ट केली
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.आर. देशपांडे व कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका तृथी प्रदीप उपस्थित होत्या. प्राचार्यांनी अभिजात मराठी भाषेचे महत्त्व सांगून सर्व विद्यार्थ्यांना मराठी भाषादिनाच्या शुभेच्छा दिल्या. ‘गर्जते मराठी कार्यक्रम' गणेशवंदना व सरस्वती वंदना सादर करुन सुरू करण्यात आला. त्यानंतर लेख, कथा, कविता, अभंग, गवळण, भारुड, कीर्तन, नाट्यगीत, लावणी, कोळी नृत्य अशा विविध कलांचं सादरीकरण विद्यार्थ्यांनी करून मराठी भाषेचं श्रेष्ठत्व दाखवून दिले. शेवटी मराठी अभिमान गीतावर नृत्य सादर केले गेले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमात पदवी व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या सुंदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक निर्मिती वाघे या विद्यार्थ्यांनीने केले, तर कार्यक्रमाचे निवेदन युगंधर आराेंदकर व आदिती लवंदे या विद्यार्थ्यांनी अतिशय प्रभावीपणे केले. सौ. दिपाली वलेकर यांनी अतिशय समर्पक शब्दांत आभारप्रदर्शन केले. याप्रसंगी पदवी व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक आवर्जून उपस्थित होते.