महापालिकेची अग्निशमन यंत्रणा टाकणार कात

पनवेल : पनवेल महापालिका हद्दीतील अग्निशमन यंत्रणेची सुधारणा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने विविध पावले उचलली आहेत. सध्या महापालिकेकडे ३ अग्निशमन केंद्रे आहेत. परंतु, वाढत्या लोकसंख्येच्या मागणीनुसार आणि नवीन गृहप्रकल्प उभारणीच्या पार्श्वभूमीवर खांदेश्वर स्थानकाजवळ नवीन अद्ययावत अग्निशमन केंद्र उभारण्याचे काम लवकरच सुरु होणार आहे. याशिवाय ४ नवीन अग्निबंब आणि ५५ मीटर उंचीची शिडी लवकरच महापालिकेच्या तापयात दाखल होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

पनवेल महापालिकेच्या स्थापनेपूर्वी येथे एकच अग्निशमन केंद्र होते. नंतर सिडको वसाहतींचे हस्तांतरण महापालिकेकडे झाल्यानंतर नवीन पनवेल आणि कळंबोली येथील अग्निशमन केंद्रही महापालिकेकडे आले. सद्यस्थितीत पनवेल महापालिकेकडे ३ अग्निशमन केंद्रे असून, १३५ कर्मचारी अग्निशमन यंत्रणेच्या कार्यासाठी तैनात आहेत. नवी मुंबई विमानतळाच्या कामांमुळे कामोठे, कळंबोली, तळोजा, रोहिंजन, घोटगाव, नावडे आणि खारघर परिसरात गृहप्रकल्पांची उभारणी सुरु आहे. यामुळे भविष्यात आग प्रतिबंधक यंत्रणांची कार्यक्षमता वाढविणे गरजेचे आहे.

खांदेश्वर स्थानकाजवळील नवीन केंद्र उभारुन या भागातील नागरिकांना तत्काळ अग्निशमन सेवा उपलब्ध करुन देण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. ‘सिडको'ने उभारलेली नवीन पनवेल आणि कळंबोली येथील अग्निशमन केंद्रे सुमारे ४० वर्षे जुनी आहेत. या केंद्रांच्या इमारत जीर्ण झाल्याने नव्याने बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या भागामध्ये नवीन गृहप्रकल्प उभारले जात असून, लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात भर पडली आहे. महापालिका आयुक्त मंगेश चितळे आणि उपायुक्त कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठ्यात लवकरच नवीन अद्ययावत अग्निशमन केंद्र उभारले जाणार आहे. तसेच तळोजा घोट परिसरात अग्निशमन केंद्र उभारण्याचा महापालिकेचा मनोदय आहे.
-प्रवीण बोडके, मुख्य अग्निशमन अधिकारी, पनवेल महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नमुंमपा दिंडी स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धेची १५ सप्टेंबर रोजी अंतिम फेरी