पनवेलमध्ये महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार
पनवेल : नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाने पनवेलमध्ये राहणाऱया एका महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या पोलीस उपनिरीक्षकाने पीडित महिला पोलिसाचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर मागील पाच वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचा तसेच तिचा जातीवाचक अपशब्द वापवरुन अपमान केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. त्यानुसार पनवेल तालुका पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षकावर बलात्करासह ऍट्रोसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुह्यात पोलीस उपनिरीक्षकाच्या आईलाही सहआरोपी करण्यात आले आहे.
या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला पोलीस उपनिरीक्षक सध्या वाशी पोलीस ठाण्यात कार्यरत असून 2020 मध्ये तो तळोजा पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्याची पीडित महिला पोलिसाशी ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाल्यानंतर मार्च 2020 मध्ये पोलीस उपनिरीक्षकाने चहा पिण्याच्या बहाण्याने पीडितेला पनवेलमधील नेरे, महालक्ष्मीनगर येथील आपल्या भावाच्या खोलीवर नेले. तेथे त्याने चहामध्ये गुंगीकारक औषध मिसळून पीडितेला बेशुद्ध केले. त्यानंतर त्याने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. इतकेच नव्हे, तर या घटनेवेळी तिचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिला गप्प बसवले.
त्यानंतर पोलीस उपनिरीक्षकाने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत एप्रिल 2020 ते एप्रिल 2025 दरम्यान पनवेल येथील घरात आणि खांदा कॉलनीतील खांदेश लॉजमध्ये वारंवार पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. याच कालावधीत आरोपीने चारचाकी वाहन घेण्यासाठी पीडितेकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास तिचे आक्षेपार्ह फोटो मुलाला दाखवण्याची धमकी देऊन पीडितेकडून दोन लाख रुपये ऑनलाइन आणि तीन लाख रुपये रोख स्वरुपात उकळले.
दरम्यान, आरोपीचा पहिल्या पत्नीपासून घटस्फोट झाल्यानंतर पीडितेने लग्नाची मागणी केली असता, या पोलीस उपनिरीक्षकाने तिच्या मुलाच्या वयाचा संदर्भ देत तिला जातीवाचक अपशब्द वापरले आणि अपमानित केले. त्यामुळे पीडितेने याबाबतची माहिती पोलीस उपनिरीक्षकाच्या आईला दिली असता, तिने देखील पीडितेला जातीवरुन शिवीगाळ केली आणि तिचा अपमान केला.
या संपूर्ण प्रकारामुळे त्रस्त झालेल्या पीडित महिलेने पनवेल तालुका पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पनवेल तालुका पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक आणि त्याच्या आईविरुद्ध बलात्कार, धमकी, फसवणूक आणि अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील कार्यवाहीला सुरुवात केली आहे.