‘महावितरण'चा वर्धापन दिन उत्साहात साजरा
ठाणे: ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी आणि शेवटच्या ग्राहकापर्यंत वीज पुरवठा करण्यासाठी सक्षम वीज वितरण यंत्रणा उभारण्याचा तसेच त्याची देखभाल करण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ'चे विलगीकरण करुन २००५ साली महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण कंपनी निर्माण करण्यात आल्या. ६ जून रोजी ‘महावितरण'च्या २० वा वर्धापन दिनानिमित्त भांडुप परिमंडल आणि ठाणे मंडळ कार्यालय तर्फे ठाणे येथील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता संजय पाटील यांच्यासह ठाणे मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता युवराज मेश्राम, भांडुप परिमंडलाचे सहाय्यक महाव्यवस्थापक (वि व ले) प्रवीण रहांगदळे, सहाय्यक महाव्यवस्थापक (मा सं) सौ. नमिता गझदर तसेच परिमंडल तसेच मंडळ कार्यालयातील इतर वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
यावर्षी वर्धापन दिन आगळ्या-वेगळ्या पध्दतीने साजरा करण्यात आला. महावितरण मुख्यालयाने ‘शून्य अपघात महावितरण, शून्य अपघात महाराष्ट्र' अशी एक वेगळी संकल्पना मांडली असून १ ते ६ जून या कालावधीत वीज सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला. वर्धापन दिन कार्यक्रमात दीप प्रज्वलनानंतर उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुरक्षा प्रतिज्ञा घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महावितरण'ला दिलेला व्हिडिओ संदेश तर ‘महावितरण'चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी कर्मचाऱ्यांना संबोधित करतानाची चित्रफित दाखविण्यात आली. त्यानंतर दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि मेडल देऊन गौरविण्यात आले. तसेच सुरक्षा सप्ताह दरम्यान झालेल्या स्पर्धांमधील विजेत्यांना देखील प्रमाणपत्र आणि मेडल देण्यात आले.
यावेळी मुख्य अभियंता संजय पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. व्यवस्थापक (मा सं ) सौ. रसिका भोले यांनी शिवराज्याभिषेक निमित्त शिवाजी महाराजांच्या शूर पराक्रमाबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाणे मंडळ अधीक्षक अभियंता युवराज मेश्राम यांनी केले. यावेळी ‘महावितरण'ने केलेल्या मागील २० वर्षातल्या उत्तम कारगिरीबद्दल चित्रफीतही दाखविण्यात आली. वर्धापन दिनानिमित्त नाट्यगृहात ‘महावितरण'च्या कर्मचाऱ्यांसाठी रक्तदान शिबीर संपन्न झाले.
या कार्यक्रमाला यशस्वीतेसाठी कार्यकारी अभियंते लक्ष्मण पिरवानी, सतीश जाधव, चंद्रमणी मेश्राम, माणिक राठोड, दत्तात्रय पवार, आप्पासो खांडेकर, व्यवस्थापक (मा सं) सौ. रसिका भोले यांनी विशेष मेहनत घेतली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ठ अभियंता आदित्य जाधव आणि उच्चस्तर लिपिक सौ. केतकी मुळे यांनी केले.
दरम्यान, वाशी मंडळ कार्यालयातही वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्य अभियंता संजय पाटील यांनी कर्मचाऱ्यांचे विशेष मार्गदर्शन केले. वाशी मंडळाचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकारी अभियंता आणि सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले होते.