दीड कोटींची विदेशी दारु जप्त
ठाणेः ‘राज्य उत्पादन शुल्क विभाग'च्या पथकाने गोवा मध्ये तयार होणाऱ्या बनावट दारुची तस्करी करणारा ट्रक ताब्यात घेतला असून त्यातून दीड कोटी रुपयांची विदेशी दारु जप्त केली आहे. गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती ‘राज्य उत्पादन शुल्क पथक'ला मिळाली होती.
त्यानुसार पथकाने खारेगाव टोलनाका येथे सापळा रचला. ३ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पथकाला एक संशयास्पद ट्रक वाहतूक करताना दिसला. यावेळी ट्रकबाबत संशय वाढताच पोलीस पथकाने ट्रक थांबवून त्याची तपासणी केली असता ट्रकमध्ये विदेशी दारुचे १,४०० बॉक्स आढळले. त्यानुसार पोलिसांनी ट्रक चालक मोहम्मद शमशाद सलमानी याला अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून १ कोटी ५६ लाख ६३ हजार ८०० रुपयांचा माल जप्त केला आहे.