आगरी युवा साहित्यिक सर्वेश तरे यांच्या लग्नात नवा पायंडा
कल्याण : आगरी हळद-लग्न परंपरा जरी अनेक कारणांमुळे जगप्रसिध्द असली तरी अतिखर्च, कर्ज, दारु यामुळे अनेकदा तिला गालबोट लागले जाते. आगरी समाजातील अनेक पुढारी लग्न साध्या पध्दतीने व्हावे यासाठी भाषणे देतात; परंतु त्यांच्या घरातील लग्ने करोडो खर्च करुन सोहळे पार पडतात. याच गोष्टीला बगल देत ‘समाजात बदल घडवायचा असेल तर सुरवात स्वतःपासून करायला लागेल' असे म्हणत आगरी युवा साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते सर्वेश तरे आणि त्यांच्या पत्नी पुजा तरे यांनी हळदी-लग्न घरच्या घरी करत समाजात नवा पायंडा पाडला आहे.
२२ आणि २३ फेब्रुवारी रोजी त्यांचा हळद-विवाह पार पाडला. यानंतर त्यांनी साऱ्या मित्र-मंडळी आणि आप्तेष्टांना महापुजा आणि स्वागत संभारंभासाठी २५ फेब्रुवारी कशेळीयेथे आमंत्रित केले होते. सर्वेश तरे यांच्या या निर्णयाला समर्थन करीत समाजातील लोकप्रतिनिधी आमदार, माजी नगरसेवक-सरपंच, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार-साहित्यिक आवर्जुन उपस्थित होते.
जरी हळद घरच्या घरी झाली तरी हळदीचे आगरी संस्कार मंत्रोच्चार म्हणजे ‘धवला विधीे' ‘चाऊल' भिवंडी खारबाव गांवच्या धवलारीन रामप्यारी पाटील यांनी केल्या. हळदीत संध्याकाळी गायक-गीतकार दया नाईक यांच्या माध्यमातून कवी संमेलन पार पडले. ज्यात कवी सुनिल पाटील (भिवंडी), प्रकाश पाटील (पनवेल) सोबत आगरी पारंपरिक गीतांची मैफल पार पडली. तसेच लोकगायक किसन फुलोरे, धवला गायक चंद्रकला दासरी यांनी सहभागी होत आगरी-कोळी भाषेचा आणि गीतांचा जागर केला. महापुजेच्या दिवशी कशेळी गावातील ‘अग्निदेवी हरिपाठ मंडळ'तर्फे हरिपाठ सुध्दा संपन्न झाला.
सर्वेश तरे यांच्या लग्नमंडपात विषेश म्हणजे आगरी समाजातील विविध क्षेत्रातील थोर-मोठ्या व्यक्तींच्या माहितींच्या फलकाचे ‘आगरातील रत्ने' प्रदर्शन देखील भरविले होते. ज्यामध्ये बालयोगी सदानंद महाराज, लोकनेते दि. बा. पाटील, नारायण नागू पाटील, बॅरीटस्टर एटी पाटील यांच्यासह अन्य व्यक्तीमत्वांचा समावेश होता.
यासोबतच सर्वेश यांनी लग्नात आहेर न आणता त्याएवजी भेट म्हणून पुस्तके आणण्याचे आवाहन केले होते, त्याला देखील सकारात्मक प्रतिसाद मिळाला. मिळालेली पुस्तके त्यात अधिकची पुस्तके देत ते सर्व पुस्तके जवळच्या ग्रंथालयाला भेट देणार आहेत. अशा प्रकारचा विवाह सोहळा मी पहिल्यांदा पाहिला, आगरी समाजाने यातुन आदर्श घ्यावा, असे मत हास्यप्रबोधनकार यांनी व्यवत करीत उभयतांना शुभेच्छा दिल्या.