बोगस वारस दाखलाप्रकरणी दोषारोपपत्र दाखल
उर्वरीत तीन गुह्यांत देखील पोलीस लवकरच दोषारोपत्र दाखल करणार
बोगस चलान प्रकरणाचा तपास अद्याप बाकी
पनवेल : पनवेल दिवाणी न्यायालयातून बनवण्यात आलेल्या खोटया वारस दाखल्यांच्या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल एका गुह्याचा तपास पनवेल शहर पोलिसांनी पुर्ण केला आहे. त्यामुळे पोलिसांकडुन या गुह्यात सहभागी असलेल्या तीन वकिलांसह न्यायालयीन कर्मचारी व प्रॉपर्टी एजंट अशा पाच जणांविरोधात पनवेल येथील प्रथमवर्ग न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
या गुह्याव्यतिरिक्त न्यायालयाशी संबधीत बोगस व बनावट चलनाबाबत दाखल असलेल्या आणखी 3 संवेदनशिल गुह्यांचा तपास पोलिसांकडून सुरु असल्याने टफ्फ्या टफ्फ्याने उर्वरीत तीन गुह्यांमध्ये देखील दोषारोपपत्र लवकरच दाखल करण्यात येणार आहे.
पनवेल येथील दिवाणी न्यायालयातील न्यायाधीशांसह, न्यायालयातील सहाय्यक अधीक्षकांच्या बोगस सह्या करुन त्यावर न्यायालयाचे शिक्के मारुन बनावट वारस दाखले तयार केल्याचे प्रकरण गत नोव्हेंबरमध्ये उघडकीस आले होते. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुह्याचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आले. विशेष पथकाने या प्रकरणाचा तपास करत सर्वात प्रथम न्यायालयातील कर्मचारी दीपक मोहन फड (32) याला गत 23 डिसेंबर रोजी अटक केली.
पनवले न्यायालयातून वादग्रस्त बनावट वारस दाखला हा ऍड. पटवर्धन व ऍड. केळकर यांनी कनिष्ठ लिपीक दिपक फड याच्यामार्फत प्रॉपर्टी एजंट सुनिल उपाध्याय याला काढुन दिल्याचे तपासात उघडकीस आले. त्यामुळे पोलिसांनी ऍड. पटवर्धन व ऍड. केळकर या दोघांना गत 27 डिसेंबर रोजी अटक केली. त्यानंतर पोलिसांनी या दोन वकिलांची चौकशी केली असता, योगेश केळकर याची बहिण ऍड. गौरी केळकर हिने सदर बनावट वारस दाखल्यावर न्यायाधीशांच्या बोगस सह्या केल्याचे आढळून आले.
दरम्यान, सदरचा बनावट वारस दाखला प्रॉपर्टी एजंट सुनिल उपाध्याय याला बनवून दिल्याचे पोलिस तपासात उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गौरी केळकर व सुनिल उपाध्याय या दोघांना गत 21 जानेवारी रोजी अटक केली. सध्या हे पाचही आरोपी तळोजा कारागृह आणि कल्याण आधारवाडी कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.
विशेष तपास पथकाने या गुह्याचा तपास चार महिन्यात पुर्ण करुन पनवेल प्रथमवर्ग न्यायालयात या गुह्यातील पाचही आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
इतर तीन गुह्यांचा पोलिसांकडुन तपास सुरु
पनवेल दिवाणी न्यायालयातील खोटया वारस दाखल्याच्या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल गुह्याच्या तपासादरम्यान, न्यायालयातील कर्मचारी दीपक फड याने बोगस चलान बनवून न्यायालयाच्या रक्कमेचा अपहार केल्याचे देखील उघडकीस आले आहे. त्याप्रकरणात देखील पनवेल शहर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
न्यायालयातील बोगस वारस दाखला प्रकरणाशी संबधीत असलेल्या इतर तीन गुह्यांचा तपास पोलिसांकडुन अद्याप सुरु असून त्या प्रकरणात देखील पोलिसांकडुन लवकरच तपास पुर्ण होऊन दोषारोपत्र दाखल केले जाणार असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.