३.७७ कोटींचा गुटखा जप्त, ४ आरोपी अटकेत
नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने भिवंडी आणिमध्य प्रदेशातून आणलेला तब्बल ३ कोटी ७७ लाख २८ हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ५ कंटेनर आणि ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर गुटख्याचा साठा महाराष्ट्रात विक्रीसाठी आणला गेल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. दरम्यान, आरोपींनी सदर गुटख्याचा साठा कोठून आणला आणि कोठे विक्रीसाठी नेला जाणार होता? याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकाने २१ जुलै रोजी मुंबई-पुणे महामार्गावर कामोठे येथे सापळा लावून भिवंडी येथुन कामोठे येथे विक्रीसाठी आणण्यात आलेला टेम्पो पकडला होता. या कारवाईत पोलिसांनी फरहान माजिद शेख (२३) या तरुणाला अटक करुन टेम्पोसह तब्बल २२ लाख ४० हजार रुपये किंमतीचा गुटख्याचा साठा जप्त केला होता. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने आरोपी फरहान याची अधिक चौकशी केली असता, त्याने सदर गुटख्याचा साठा भिवंडीतील येवई गावातून आणल्याची कबुली दिली.
फरहान शेखकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश धुमाळ, सुरज गोरे यांनी ३ पोलीस अधिकारी आणि २० पोलीस अंमलदार यांच्या मदतीने नाशिक-ठाणे महामार्गावरील येवई गावात छापा टाकला. यावेळी सदर ठिकाणी प्रतिबंधित गुटख्याने भरलेले ४ कंटेनर आढळून आले. या कारवाईत पोलिसांनी ३ चालकांसह गुटख्याने भरलेले चारही कंटेनर बेलापूर येथील अंमली पदार्थ विरोधी कक्षात आणले. त्यानंतर अन्न-औषध प्रशासनाच्या अधिकऱ्यांच्या मदतीने त्याची तपासणी केली असता चारही कंटेनरमध्ये तब्बल ३ कोटी ५४ लाख ८८ हजार रुपये किमंतीचा प्रतिबंधित गुटखा असल्याचे आढळून आले.
त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने जितेंद्र मांगीलाल वसुनिया, भूपेंद्र राजेंद्र सिंग आणि भंवर खेमराज सिंग या ३ चालकांना अटक केली. या संपूर्ण कारवाईत ५ कंटेनर सह तब्बल ३ कोटी ७७ लाख रुपये किंमतीचा गुटख्याचा साठा जप्त करुन एकूण ४ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी दिली. कामोठे येथील कारवाईत पकडण्यात आलेला आरोपी फरहान शेख याला न्यायालयाने २५ जुलै पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली असल्याचे राजपूत यांनी सांगितले.