सीबीडी येथील टर्शिअरी ट्रीटमेंट प्लान्ट पूर्णत्वाकडे
नवी मुंबई : केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियान अंतर्गत सीबीडी-बेलापूर, सेक्टर-१२ येथील सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करण्याकरिता बांधण्यात येत असलेल्या ७.५० द.ल.लि. क्षमतेच्या ‘टर्शिअरी ट्रीटमेंट प्लान्ट'च्या सुरु असलेल्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करीत कामाला गती देऊन विहित मुदतीत सदर काम पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले आहेत. याप्रसंगी शहर अभियंता शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सदर प्रकल्प केंद्र शासनाच्या अमृत २.० योजनेंतर्गत असून काम पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पातून तयार होणाऱ्या पुनर्प्रक्रियाकृत सांडपाण्याचा उपयोग नवी मुंबई महापालिका क्षेत्रात बेलापूर विभागातील उद्याने, ट्री बेल्ट आणि रस्ते दुभाजक आदिंसाठी करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त सार्वजनिक हौसिंग सोसायट्यांमधील वाहने, उद्याने, सुशोभित जागा तसेच बांधकामे याकरिताही मागणीप्रमाणे सदर पुनर्प्रक्रियाकृत सांडपाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
याकरिता बेलापूर विभागात २३ कि.मी. लांबीची वाहिनी टाकण्याचे काम करण्यात येत असून, त्यापैकी २१ कि.मी. वाहिनीचे काम पूर्ण झालेले आहे. प्रकल्पांतर्गत कामाची पाहणी करताना प्रकल्प उभारणीचे काम ३१ मे २०२५ पर्यंत पूर्ण करुन ट्रायल रन सुरु करण्यात यावी. तसेच प्रकल्प दिलेल्या मुदतीत म्हणजेच ३१ जुलै २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. शिंदे यांनी दिले.
दरम्यान, सदर ‘टर्शिअरी ट्रीटमेंट प्लान्ट'च्या प्रकल्पाच्या संपूर्ण जागेचे सिमांकन करुन प्रकल्पाभोवती संरक्षक भिंत बांधण्यात यावी. यासोबतच सदर प्रकल्पाच्या जागेवर रस्त्यालगत वृक्षरोपण करण्यात यावे, असे निर्देश आयुवत डॉ. कैलास शिंदे यांनी यावेळी दिले. या प्रकल्पांमुळे पुनर्प्रक्रियाकृत पाण्याचा वापर पिण्या व्यतिरिक्त कामांसाठी केला जाऊन पिण्यासाठी वापराच्या पाण्याची बचत होणार आहे. त्यादृष्टीने अमृत २.० योजने अंतर्गत निर्माण होणारा सदर प्रकल्प नवी मुंबईच्या पर्यावरणशील भूमिकेला साजेसा आहे.