‘केडीएमसी'मधून बाहेर पडण्याचा २७ गावांचा निर्धार
कल्याण : २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्यासाठी ‘संघर्ष समिती'ने आक्रमक पवित्रा घेतला असून ‘२७ गाव संघर्ष समिती'मध्ये फूट पडल्यानंतर ‘सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती' स्थापन करण्यात आली. या ‘समिती'चे अध्यक्षपद खासदार सुरेश म्हात्रे यांना देण्यात आले आहे. या ‘संघर्ष समिती'ची जाहीर सभा डोंबिवलीतील होरायझन हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी ‘समिती'चे अध्यक्ष खासदार सुरेश म्हात्रे, माजी आमदार राजू पाटील, ‘ठाकरे गट'चे जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे, ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष'चे पदाधिकारी, ‘काँग्रेस'चे पदाधिकारी, भाजप आणि शिंदे गटाचे पदाधिकारी असे सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही परिस्थितीत ‘केडीएमसी'तून बाहेर पडायचे. तुम्ही ४३ वर्ष लढा लढताय, या मागणीसाठी ४३ वर्ष सातत्याने लढतोय, त्याबद्दल लढ्यात सहभागी असलेल्यांचे अभिनंदन. माझ्यावर जबाबदारी आल्यानंतर मी संस्था नोंदणी केली. कोणत्याही पक्षाचा नेता असू देत जे आपले काम करतील त्यांचे धन्यवाद मानायचे. मुख्यमंत्र्यांनी सागर बंगल्यावर बैठक लावली होती, चर्चा करताना काही राजकीय असल्याचे जाणवले नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितले एक सामाजिक कार्यक्रम लावा, ज्या ठिकाणी मी स्वतः येईल, तुम्ही मागणी करा मी होकार देईन, असे ‘संघर्ष समिती'चे अध्यक्ष सुरेश म्हात्रे सभेत म्हणाले.
आजची सभा झाल्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री यांचा वेळ घेईन. जिथे भक्ती आणि शक्ती एक होते, तिथे इतिहास घडतो. प्रत्येक ठिकाणी समाजाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. एक मोर्चा मंत्रालयावर कमीत कमी ३ ते ४ लाख लोकांचा गेला पाहिजे, त्या दिवशी तुम्हाला तुमच्या समस्या विचारतील. २७ गावांचा विषय एका वर्षात सुटलाच पाहिजे. माझ्या डिक्शनरीत अशक्य शब्द नाही, व्यासपीठावर सगळ्यांना एकत्र बघितले तेव्हा अशक्य शब्दच नाही. २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका होणारच. सुप्रीम कोर्टाने निर्णय देईपर्यंत निवडणुका स्थगित करण्यात याव्यात, अशी मागणीही करणार असल्याचे सुरेश म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.