नागरिकांना केंद्रबिंदु ठेवून कारभार -अभिनव गोयल
कल्याण : नागरिकांना केंद्रबिंदु ठेवून कारभार करणार असून शिक्षण, आरोग्यासह शहराच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याची ग्वाही कल्याण-डोंबिवली महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गोयल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, योगेश गोडसे, शहर अभियंता अनिता परदेशी, उपायुक्त संजय जाधव आदि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
याआधी धुळे आणि हिंगोली जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून आणि ‘लातर जिल्हा परिषद'मध्ये सीईओ म्हणून केलेल्या कामाचा आपल्याला अनुभव आहे. या तिन्ही ठिकाणापेक्षा कल्याण-डोंबिवली शहरात सर्वाधिक नागरीकरण झालेले आहे. या पार्श्वभूमीवर अगोदर आपल्याकडे काय काय समस्या आहेत, त्याचबरोबर काय काय प्रकल्प सुरू आहेत, त्यांना गती देण्याचा आपला प्रयत्न असेल. तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रशासन लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने १०० दिवसांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये नागरिककेंद्रीत प्रशासकीय कामकाजासाठी (सिटीजन सेंट्रिक ॲडमिनिस्ट्रेशन) आपला प्रयत्न राहणार असल्याचे आयुक्त अभिनव गोयल यांनी स्पष्ट केले.
नागरिकांच्या तक्रारी असो की त्यांना मिळणाऱ्या सेवा. त्या अधिकाधिक गतीने, पारदर्शकपणे त्यांना कशा देता येतील यासाठी काही सिस्टम्स डेव्हलप करायचे आहेत. आज टेक्नॉलॉजीचे प्रमाणही वाढलेले असल्याने ‘एओ'चाही वापर करण्याचा आपला प्रयत्न राहिल, असे आयुक्त गोयल यांनी सांगितले. तर आपण सिव्हील इंजिनिअरिंगची पदवी घेतली असल्याने कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि इतर कामांवरही आपले विशेष लक्ष राहणार असल्याचे सांगत आयुक्त गोयल यांनी आपल्या कारभाराची दिशा यावेळी स्पष्ट केली.