कल्याण-मुरबाड रेल्वेला मानिवलीकरांचा विरोध

कल्याण : मानिवली येथील शेतकऱ्यांनी कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्पाला विरोध केला आहे. शेतकऱ्यांची बागायत आणि जिरायत जमीन तसेच घरे जात असून शेतकरी बेघर होत आहेत. आमच्या घरावर बुलडोझर फिरवून तुम्हाला विकास करायचा आहे का? असा सवाल करत शेतकऱ्यांनी मुरबाड रेल्वे प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे.

याबाबत मानीवली गांवचे शेतकरी-भूमीपुत्र अँड. सुनील गायकर यांनी सांगितले की, मुरबाड रेल्वे प्रकल्पामुळे आमच्या गावातील अनेक शेतकरी बेघर होत आहेत. बागायत आणि जिरायत जमीन तसेच घरे प्रकल्पामध्ये जात आहेत. जर एखादा प्रकल्प शेतकऱ्यांना बेघर करीत असेल, आमच्या घरावर बुलडोझर चालविला जाणार आहे. आम्ही ३० वर्षापासून लावलेली विविध प्रकारची रोजगार देणारी झाडे नष्ट होत आहेत. तसेच वाड-वडिलांना जपलेली जमीन जात आहे. आंबे, सुपारी, काजू, फणस आदि सर्व झाडे बाधीत होत आहेत. शेतकरी बेघर होत असल्याने अशा प्रकाराचा प्रकल्प काय कामाचा? असा सवाल केला आहे.

याबाबत माजी सरपंच विलास गायकर यांनी सांगितले की, गुजरात-बडोदा महामार्गामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. त्यानंतर गॅस पाइपलाईन मध्ये जमिनी गेल्या आणि आता राहिलेली जमीन रेल्वे प्रकल्पला मग आम्ही काय करायचे. आमची उपजीविका शेतीवर आहे; परंतु शेती नष्ट झाली तर शेतकरी कसा जगणार? असा सवाल गायकर यांनी केला आहे.

यावेळी शेतकरी सुनील गायकर, द्वारकानाथ गायकर, चंद्रकांत गायकर, विलास गायकर, विश्वनाथ वारडघे, जगदिश गायकर, शंकर माळी, रुपेश गायकर, उद्देश माळी, भाऊ गायकर, ज्ञानेश्वर जाधव यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते. या शेतकऱ्यांनी घराला काळे झेंडे लावून शासनाचा निषेध व्यक्त केला.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘मिशन भरारी'मुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचे आभाळाशी नाते