बॉक्सिंग चॅम्पियन पद्मविभूषण मेरी कोम यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा संपन्न

नवी मुंबई : कोणत्याही क्षेत्रात योग्य रितीने मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही हे लक्षात घ्या, त्याला बॉक्सिंगचे क्षेत्र सुध्दा अपवाद नाही असे सांगत जागतिक किर्तींच्या बॉक्सिंग चॅम्पियन पद्मविभूषण मेरी कोम यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी बॉक्सिंग खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. सातत्याने सराव, नवनवीन गोष्टी शिकण्याची इच्छा, जिद्द आणि चिकाटी हे अत्यंत महत्वाचे गुण असून एका यशाने समाधानी न होता व एका अपयशाने खचून न जाता सतत खेळत राहणे हाच यशाचा खरा मंत्र असल्याचे त्या म्हणाल्या.

नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील आणि ऑलिम्पिक पदक विजेत्या सुप्रसिद्ध भारतीय बॉक्सर मेरी कोम यांच्या प्रमुख उपस्थितीत मरिन बॉक्सींग ॲकेडमी या नामांकित क्रीडा संस्थेच्या वतीने, नवी मुंबई महापालिकेच्या सहयोगाने, नेरूळ येथील नेक्सस सीवूड मॉलमध्ये ‘आयबीए ग्लोबल बॉक्सिंग सिरीज (IBA Global Boxing Series)’ या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नवी मुंबई महापालिकेच्या क्रीडा, सांस्कृतिक- युवक कल्याण समितीचे सभापती गिरीश म्हात्रे, उपआयुक्त अभिलाषा पाटील, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, क्रीडापटू हितेश चौधरी व मरिन बॉक्सिंग अकॅडमीचे प्रमुख देवराज दास आदी मान्यवर उपस्थित होते.

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विविध खेळांना चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देऊन खेळांडूमध्ये प्रेरणा निर्माण करण्याचे काम केले जात असल्याचे सांगत महापौर सुजाता पाटील यांनी मेरी कोम यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित बॉक्सिंग चॅम्पियन या स्पर्धेच्या निमित्ताने नवी मुंबईत आल्याने या स्पर्धेची उंची वाढल्याचे सांगितले. यापुढील काळात सर्वच खेळांसाठी पायभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबध्द राहून प्रयत्न करण्यात येतील, असे त्या म्हणाल्या. याप्रसंगी क्रीडा रसिक व विशेषत्वाने युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Previous

शिवसेना उरण ने जपली सामाजिक बांधिलकी