साडेबारा टक्के भूखंडासाठी सिडको भवनात शेतकऱ्यांचा ठिय्या;
नवी मुंबई : प्रलंबित साडेबारा टक्के (12.5%) भूखंड योजनेसाठी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी सीबीडी बेलापूर येथील सिडको भवन कार्यालयात अचानक घुसून जोरदार गोंधळ घातला. यात सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांसोबत धक्काबुक्की झाल्याचे समोर आले आहे. नावडे आणि रोडपाली गावातील सुमारे ४० ग्रामस्थांनी एकत्र येत सिडकोच्या कारभारावर संताप व्यक्त केला. परिस्थिती चिघळल्यानंतर अखेर सिडकोच्या सह-व्यवस्थापकीय संचालकांनी पुढील दोन महिन्यांत भूखंड देण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, १९७० मध्ये सिडकोने ग्रामस्थांच्या जमिनी संपादित केल्या होत्या. नुकसान भरपाई म्हणून साडेबारा टक्के भूखंड योजना लागू करण्यात आली. २०१९-२० मध्ये काही मोजक्या शेतकऱ्यांना सेक्टर ४५ मध्ये भूखंड देण्यात आले, मात्र उर्वरित शेतकऱ्यांना नंतर भुखंड वाटप करण्याचे आश्वासन सिडकोने दिले होते. अनेक वर्षे उलटूनही भूखंडाचे वाटप न झाल्याने नावडे आणि रोडपाली गावातील महिला आणि पुरुषांनी सोमवारी अचानक आक्रमक पवित्रा घेतला.
या संतप्त ग्रामस्थांनी थेट सिडको भवनच्या दुसऱ्या मजल्यावरील सह-व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांच्या दालनाबाहेर धाव घेत सिडकोच्या दिरंगाईवर संताप व्यक्त केला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे सिडकोची सुरक्षा यंत्रणा गोंधळून गेली. आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न असफल ठरला. या गोंधळात काही ग्रामस्थांनी सिडकोचे सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांसोबत धक्काबुक्की केली. या घटनेनंतर, या सर्व ग्रामस्थांविरुद्ध सीबीडी पोलीस ठाण्यात बेकादेशीर जमाव जमवून गोंधळ घालणे आणि सरकारी कामात अडथळा आणणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सिडकोचे सह-व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांनी स्वतः आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी शेतकऱ्यांना शांत करत, पुढील दोन महिन्यांच्या आत साडेबारा टक्के योजनेतील भूखंड देण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे ठोस आश्वासन दिले. या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन तात्काळ थांबवले. या घटनेने सिडकोच्या प्रलंबित योजनांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.