कोपरखैरणे मध्ये ना. गणेश नाईक यांच्या हस्ते विद्यार्थी-विद्यार्थिनी गुणगौरव

नवी मुंबई : भारतीय जनता पार्टी, श्री प्रतिष्ठान यांच्या मार्फत सामाजिक कार्यकर्ते शिरीष प्रभाकर पाटील आणि निशा शिरीष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी-विद्यार्थिनी गुणगौरव सोहळा ७ जून रोजी कोपरखैरणे येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात  राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्हा पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि कोपरखैरणे मधील विशिष्ट रहिवाशांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी माजी नगरसेवक केशव म्हात्रे, समाजसेवक संदीप म्हात्रे, दाजी सणस, निकेतन हांडे पाटील, माजी नगरसेविका संगीता म्हात्रे, प्रा. प्रताप महाडिक, ‘ज्ञान विकास संस्था'च्या प्राचार्य अपर्णा पाटील, ‘कोपरखैरणे पोलीस ठाणे'चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, ‘ग्रामविकास मंडळ'चे अध्यक्ष सोपान म्हात्रे, शिरीष प्रभाकर पाटील, निशा शिरीष पाटील, समाजसेविका आशाताई शेगदार, गजानन पाटील, रघुनाथ पाटील, चंद्रकांत मोरेश्वर पाटील, प्रेमळ म्हात्रे, चंद्रकांत वेटा, दिनेश म्हात्रे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरीष पाटील हाडाचे समाजसेवक आहेत. शिरीष पाटील गेल्या १८ वर्षांपासून कोपरखैरणे गावामधील विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्यासाठी सत्कार समारंभ आयोजित करत आलेले आहेत. भविष्य काळात विद्यार्थी-विद्यार्थिनीना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांचे कार्य गतिमान, शक्तिमान होईल, असा माझा विश्वास आहे, असे मनोगत यावेळी लोकनेते ना. गणेश नाईक यांनी व्यक्त केले.

‘यंदा १८व्या वर्षी गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार करताना खूप आनंद होत आहे. आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळी मुले-मुलींची टक्केवारी ६०, ६५, ७०, ८० टक्के होती. मात्र,१८व्या वर्षी ती टक्केवारी ९८.८ टक्केवर आली आहे. यात कुठलाही भेदभाव न करता सर्व गुणवंतांना बोलावून सत्कार करायचा प्रयत्न करत आहे. यावेळी आम्ही जवळपास ३५० गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार केला. याशिवाय विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नागरिकांचा सत्कार केला. ना. गणेश नाईक आल्यानंतर कार्यक्रमाला सणाचे महत्त्व येते. त्यांची उपस्थिती आमच्यासाठी खूप प्रेरणादायक आहे. प्रत्येक जण अभिमानाने ना. गणेश नाईक यांचा कार्यकर्ता म्हणून सामाजिक कार्यात आपले योगदान देण्याचा प्रयत्न करत असतो', असे यावेळी आयोजक शिरीष प्रभाकर पाटील यांनी सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

विमानतळाला ‘दिबां'च्या नावाबाबत गौडबंगाल -महेंद्र घरत