वापरानंतरच्या कपड्याचे व्यवस्थापन करणारा अभिनव प्रकल्प देशात पहिल्यांदाच नवी मुंबईत
नवी मुंबई : सध्या बदलत्या फॅशन ट्रेंडमुळे कपडे वापरण्याचा कालावधी कमी झाला असून त्यामुळे कपडे टाकून देण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावर ठोस उपाय योजना करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या अखत्यारितील वस्त्र समितीच्या वतीने पुढाकार घेण्यात येऊन टाकाऊ वस्त्रावर प्रक्रिया करुन त्याचा पुनर्वापर करण्याचा नाविन्यपूर्ण प्रकल्प नवी मुंबईत राबविण्यात येत आहे.
केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालय अंतर्गत टेक्सटाईल कमिटी, नवी मुंबई महापालिका यांच्या माध्यमातून हा अभिनव प्रकल्प देशात पहिल्यांदाच नवी मुंबईत राबविण्यात येत असून यामध्ये एसबीआय फाऊंडेशन लि.,आयडीएच इंडिया हब प्रा.लि., टिसर आर्टिसन ट्रस्ट या संस्थांचा सहयोग असणार आहे. या 5 संस्थांमध्ये या बाबतचा सामंजस्य करार करण्यात आला असून या प्रकल्पाचे उद्घाटन 11 ऑक्टोबर 2024 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले आहे.
नवी दिल्ली येथील विशेष समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नवी मुंबईत हा अभिनव प्रकल्प राबविला जात असल्याचा विशेष उल्लेख केला होता.
कापड मूल्य साखळीतील शाश्वतता आणि परिपूर्णता लक्षात घेत वापरानंतरच्या वस्त्रांचे सुयोग्य व्यवस्थापन करणारा हा प्रकल्प टाकून दिलेल्या कपड्याचे मूल्यवान उत्पादनामध्ये रुपांतर करणार असून याव्दारे स्थानिक कारागीरांना शाश्वत रोजगार उपलब्ध होणार आहे. यामध्ये विशेषत्वाने महिलांचे सबलीकरण होण्यास मदत होणार आहे.
या प्रकल्पांतर्गत टाकाऊ वस्त्रांचे सकलन करण्याकरिता पहिल्या टप्यात नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील 250 सोसायट्यांमध्ये जुने कपडे संकलन करण्याकरिता पेट्या ठेवण्यात येणार असून महापालिकेच्या पुढाकाराने एस.बी. आय. फाउंडेशन लि. यांच्या मदतीने व टिसर आर्टिसन ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेमार्फत एकुण 47 सोसायट्यांमध्ये स्वतंत्र 49 पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. उर्वरित पेट्या टप्प्याटप्प्याने इतर सोसायट्यांमध्ये ठेवण्यात येणार आहेत.
बेलापूर येथील शकुंतला महाजन बहुउद्देशीय इमारत, से.2, सीबीडी बेलापूर या ठिकाणी संकलित वस्त्रावर पुढील प्रक्रिया करण्याकरिता टाकाऊ वस्त्र प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले आहे.
सदर प्रकल्प राबविल्याने नवी मुंबई महापालिका क्षेत्रातून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी जाणा-या कच-याचा भार काही अंशी कमी होणार असून कचरा कमी करण्याप्रमाणेच महिलांना रोजगारही उपलब्ध होणार आहे.
वापरानंतरच्या वस्त्रांचे व्यवस्थापनाचा अभिनव प्रकल्प राबविण्यासाठी नवी मुंबई महापालिकेची देशातून निवड करण्यात आली ही सर्वच नागरिकांसाठी अभिमानाची गोष्ट असून नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यात आघाडीवर असणारी आपली महापालिका हा उपक्रमही यशस्वी करेल असा विश्वास व्यक्त करीत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आपल्या घरातील चांगल्या स्वरुपाचे टाकाऊ कपडे नागरिकांनी सोसायटीमध्ये दिलेल्या स्वतंत्र पेट्यांमध्ये जमा करावेत अथवा आपल्या जवळच्या थ्री आर सेंटरमध्ये ठेवावेत आणि हा अभिनव प्रकल्प यशस्वी करण्यासाठी संपूर्ण योगदान द्यावे, असे आवाहन केले आहे.