अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना भरपाई द्या
कल्याण : १८ आणि २० ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे कल्याण पूर्वेतील शिवाजीनगर अशोकनगर वालधुनी या ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी घुसून मालमत्तेचे नुकसान झाले असून त्यांचा पंचनामा करुन त्यांना भरपाई देण्यात यावी यासाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट'चे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्ष विक्रम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस मनोज नायर, संतोष पाटील, गोरख शिंदे, समर्थ माशाळ, नीलम पगारे, शबनम शेख अलीम, दुर्गा नाईक, रिषभ रावत, अदवीत कुरुप, आदि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. तहसीलदार यांना निवेदन देऊन येथील नुकसानीचा त्वरित पंचनामा करुन संबंधितांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी पत्राद्वारे मागणी करण्यात आली. यावेळी तहसीलदारांनी लवकरात लवकर पंचनामा करुन येथील नागरिकांना न्याय देण्यात येईल, असे आश्वासन दिले.
अतिवृष्टीमुळे कल्याण शहरातील वालधुनी, अशोकनगर आणि शिवाजीनगर या परिसरातील चाळी आणि झोपडपट्टी असलेल्या या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने लोकांच्या घरांचे आणि मालमत्तांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. काही ठिकाणी तलाठी यांनी मालमत्तांचे सर्वेक्षण करुन पंचनामे केले आहेत. मात्र, त्याबाबत पुढे अद्याप नागरिकांना शासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. या परिसरात मोठ्या प्रमाणातील मालमत्ता आणि घरांचे अद्याप सर्वेक्षणच झालेले नाही. तर तेथील नागरिकांना कोरे फॉर्म दिलेले असून त्यांनी ते भरून द्यावेत, असे सूचित करण्यात आले आहे. मात्र, या बाधित मालमत्तांचे महसूल विभागामार्फत प्रत्यक्ष सर्वेक्षण होऊन पंचनामा झाल्यास त्यांना शासकीय मदत मिळण्यास मदत होणार आहे.
त्यामुळे ज्या मालमत्तांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण झालेले नाही त्या मालमत्तांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून त्यांचे पंचनामे व्हावेत आणि त्यांना लवकरात लवकर शासकीय मदत मिळून त्यांचे जीवन पूर्व पदावर येण्यास पुढाकार घेऊन सहकार्य करण्याची मागणी ‘राष्ट्रवादी'तर्फे करण्यात आली आहे.