साखरचौथ गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना
उरण : नुकतीच अनंत चतुर्दशी झाली आणि १० दिवस भक्तांच्या घरी विराजमान झालेल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. त्यानंतर भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुथा म्हणजेच १० सप्टेंबर रोजी साखरचौथ गणेशाचे आगमन मोठ्या धुमधडाक्यात झाले आहे. उरण, पनवेल, पेण या तालुक्यात मोठ्या प्रमाणात साखरचौथ गणेशोत्सव साजरा केला जात असून साखरचौथीच्या घरगुती आणि सार्वजनिक अशा सुमारे ८८० गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तसेच याच साखर चौथीच्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून भाविकांनी चिरनेर गावातील महागणपती मंदिरात दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळत होते.
साखरचौथ गणपतीच्या प्रथेला कोणताही लिखित आणि शास्त्रीय आधार मिळत नाही. कोणतीही पौराणिक कथा यामागे आढळून येत नाही; परंतु वर्षानुवर्षे परंपरा सुरु आहे. गणेशाच्या प्रतिस्थापनेसाठी सहसा पितृपक्षाचा विचार केला जात नाही. पूर्वी गणपती दीड दिवसाचे होते. परंतु, गेल्या काही वर्षांपासून काही ठिकाणी या गणपतीची स्थापना अडीच आणि पाच दिवसही करण्यात येते. ज्यांना गणेश चतुर्थीच्या दिवशी काही कारणास्तव गणेशमूर्ती आणणे शक्य नसते, त्यांच्याकडून साखरचौथ गणपतीचा पर्याय स्वीकारला जातो.
साखरचौथ गणेशाची प्रतिस्थापना पनवेल, उरण, पेण आणि अलिबाग या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. आता हळूहळू संपूर्ण जिल्ह्यात या गणेशोत्सवाचे वातावरण निर्माण होत आहे. उरण तालुक्यात मागील ४० ते ५० वर्षांपासून साखरचौथ गणेशोत्सव साजरा केला जात असून हळूहळू या उत्सवाची क्रेज वाढत चालली आहे. त्यात तरुण पिढीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापन करुन सदर गणेशोत्सव सोहळा धुमधडाक्यात साजरा करण्यास सुरुवात केली आहे. विभक्त कुटुंब पध्दती वाढत चालल्याने प्रत्येकाला हौस म्हणून घरी गणपती आणावासा वाटतो. मूळ कुटुंबात गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती असल्यामुळे गणेशोत्सव झाल्यानंतर साखरचौथच्या दिवशी अनेक जण आपल्या घरात गणपतीची प्रतिस्थापना करतात. गणेश चतुर्थीच्या काळात जर घरात काही दुर्घटना घडली अथवा सुतक आले तर ते संपल्यावर त्यावर्षी साखरचौथच्या दिवशी पर्याय म्हणून गणपतीची स्थापना केली जाते. त्यामुळे साखरचौथ गणेशोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.