कोकण रेल्वे मान्सूनसाठी सज्ज

नवी मुंबई : ‘कोकण रेल्वे कॉर्पोरेशन महामंडळ'ने या पावसाळ्यातील संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी सर्वंकष तयारी केली असून प्रवासी सुरक्षितता आणि सेवा सातत्य सुनिश्चित करण्यासाठी व्यापक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. कोकणातील खडबडीत भूभाग आणि मुसळधार पावसामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी ‘कोकण रेल्वे'ने पायाभूत सुविधा मजबुतीकरण, रिअल-टाईम देखरेख, गस्त, आणि आपत्कालीन प्रतिसाद यांचा समावेश असलेला कृती आराखडा लागू केला आहे. यासोबतच कोकण रेल्वे महामंडळ आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेत असून प्रवाशांना सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासन कटीबध्द असल्याचे सांगत ‘कोकण रेल्वे'ची मान्सून तयारीची माहिती ‘कोकण रेल्वे'चे अध्यक्ष तथा मुख्य व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी दिली. 

पावसाळी गस्त आणि देखरेख...
पावसाळी कालावधीत ६३६ प्रशिक्षित कर्मचारी संवेदनशील ठिकाणी २४ तास गस्त घालणार आहेत. चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि वरणा येथे माऊंटेड एक्स्कॅव्हेटर्स तैनात करण्यात आले आहेत. वीर, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, कुडाळ, वरणा, कारवार, भटकळ आणि उडुपी येथे रेल मेंटेनन्स व्हेईकल्स सज्ज ठेवण्यात आली आहेत. माणगांव, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, करमली, कारवार आणि उडुपी येथे टॉवर वॅगन्स सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

अत्याधुनिक संचार व्यवस्था...
सुरक्षाकर्मींना नियंत्रण कार्यालयाशी संपर्कासाठी मोबाइल फोन देण्यात आले आहेत. लोको पायलट आणि गार्ड यांना वॉकी-टॉकी प्रदान करण्यात आली आहेत. प्रत्येक १ कि.मी. अंतरावर आपत्कालीन संचार सॉकेटस्‌ बसवण्यात आली आहेत.
ॲडव्हान्स रिवस मशीनमध्ये सॅटेलाईट फोन उपलब्ध करून आपत्ती प्रतिसादादरम्यान संचार क्षमता वाढवण्यात आली आहे.

कमी प्रकाश आणि धुक्याच्या परिस्थितीत दृश्यमानतेसाठी रेल्वे मार्गावर एलईडी सिग्नल्स बसवण्यात आले आहेत.

कोकणवासियांना मोठी भेट...
वास्तविक पाहता दरवर्षी चाकरमानी गणपती सणावेळी रेल्वेचे अथवा एसटी-खाजगी बसेस ऐवजी स्वतःचे खाजगी वाहन घेऊन प्रवास करतात. पण, दरवर्षी कोकणात जाताना चाकरमान्यांना वाहतूक काेंडीत १५-१५, २०-२० तास अडकावे लागले आहे. त्याअनुषंगाने पत्रकारांनी मुद्दा उपस्थित करताच कोकणवासियांनी यंदा गणपती मध्ये आपली गाडी घेऊनच ‘कोकण रेल्वे'ने प्रवास करावा. त्याअनुषंगाने खाजगी गाड्या ‘रेल्वे'च्या रो-रो सेवे अंतर्गत घेऊन जाण्याबाबत कोकण रेल्वे सकारात्मक विचार करीत असून गणपती सणाआधी या सेवेची घोषणा करण्याचे सूतोवाच अध्यक्ष झा यांनी यावेळी केले.

दरम्यान, संकल्प केल्याप्रमाणे खरोखरीच कोकणवासिय विशेषतः गणपती सणात आपली खाजगी वाहने ‘कोकण रेल्वे'च्या रो-रो सेवेतून घेऊन गेल्यास त्यांना किमान वेळेत आपल्या गावाकडे पोहोचणे शवय होईल. त्यामुळे तो एक कोकणवासियांना गणपती सणावेळी मोठा दिलासा मिळू शकतो. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संदीप नाईक प्रतिष्ठान आणि ग्रीन होप संस्थेतर्फे वृक्षारोपण मोहीम संपन्न