नवी मुंबईत १४ ठिकाणी देशी वृक्षरोपांची लागवड
नवी मुंबई : ‘जागतिक पर्यावरण दिन'चे औचित्य साधून नवी मुंबई महापालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पर्यावरणपूरक उपक्रम आठही विभाग कार्यालय क्षेत्रात राबविण्यात आले. या अंतर्गत उद्यान विभागाच्या वतीने १४ ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम नागरिकांच्या उत्साही सहभागातून संपन्न झाले.
यामध्ये वृक्षारोपणाचा मुख्य कार्यक्रम पारसिक हिल, सीबीडी-बेलापूर येथे संपन्न झाला. याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार आणी डॉ. राहुल गेठे, उपायुक्त किसनराव पलांडे (उद्यान), उपायुक्त शरद पवार (प्रशासन), उपायुक्त सोमनाथ पोटरे (परिमंडळ-१), उपायुक्त डॉ. अजय गडदे (घनकचरा व्यवस्थापन) आणि इतर अधिकारी, कर्मचारी तसेच आगाखान एजन्सी फॉर हॅबिटॅट संस्थेच्या विशेष कार्यकारी अधिकारी प्रेरणा लांगा आणि त्यांचे सहकारी त्या सोबतच विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, प्रतिनिधी, बचत गटांच्या महिला प्रतिनिधी, एनएसएसचे विद्यार्थी यांच्या हस्ते वृक्षरोपण संपन्न झाले.
महापालिकेने यावर्षी १.२५ लक्ष वृक्षारोपण-संवर्धनाचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवले असून त्यापैकी सीबीडाबेलापूर, पारसिक हिल येथे बेलापूर पाण्याच्या टाकीजवळ आग्रोळी गावाकडून महापौर निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यानजिक डोंगराळ भागात सुरंगी, जांभूळ, मलबेरी, काजू, आवळा, बांबू अशा देशी प्रजातींच्या २५० हून अधिक वृक्षरोपांची लागवड करण्यात आली.
अशाच प्रकारचे वृक्षारोपण उपक्रम आठही विभाग कार्यालय क्षेत्रात १४ ठिकाणी राबविण्यात आले असून प्रत्येक ठिकाणी तेथील स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि वृक्षप्रेमी नागरिक यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभला. त्यासोबतच विविध सोसायट्या, स्वयंसेवी संस्था-मंडळे, महिला बचत गट यांच्या वतीनेही महापालिकेकडून वृक्षरोपे घेऊन वृक्ष लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे पक्ष्यांचा अधिवास वाढून जैवविविधतेत भर पडण्याच्या दृष्टीने प्राधान्याने देशी वृक्षरोपांची लागवड करण्यात आलेली आहे.