‘ठामपा'च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

ठाणे : ‘हुडको'सह विविध पुरस्कारांवर आपली मोहर उमटविणाऱ्या ठाणे महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता चांगली रहावी, यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा प्रकल्प अंतर्गत महापालिकेच्या प्रयत्नांचा गौरव ‘आयफॅट इंडिया-२०२५' कार्यक्रमात ‘हरित यशोगाथा सन्मान'ने करण्यात आला. ‘वायू' संकल्पनेवर, १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या वर्गवारीत, ठाणे महापालिकेला गौरविण्यात आले आहे.

महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण-हवामान बदल विभागामार्फत, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई आणि युनिसेफ, महाराष्ट्र यांच्या सहकार्यातून आयफॅट इंडिया-२०२५ प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षमता वृध्दीसाठी, नवीन उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हवामान कृतींबाबत स्थानिक आवश्यकता निश्चित करण्यासाठी ‘माझी वसुंधरा अभियान'मध्ये १४ ऑक्टोबर रोजी ‘आयफॅट इंडिया-२०२५'चे मुंबईत आयोजन करण्यात आले.

राष्ट्रीय स्तरावरील या व्यासपीठावर  ‘महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थामधील हवामानाची स्थिती'  विषयावरील कार्यक्रमात ठाणे महापालिकेला ‘हरित यशोगाथा सन्मान-२०२५' देऊन सन्मानित करण्यात आले. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या वतीने सदर सन्मान उपायुक्त (पर्यावरण) मधुकर बोडके, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, उपपर्यावरण अधिकारी विद्या सावंत यांनी स्वीकारला.

ठाणे महापालिकेने राष्ट्रीय स्वच्छ हवा प्रकल्पात हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यात १२३ ई-बसेस खरेदी करण्यात आली आहे. आणखी १६० ई-बसगाड्यांची निविदा अंतिम टप्प्यात आहे. तसेच उपमुख्यमंत्री हरित ठाणे योजना अंतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रात २ लाखापर्यंत वृक्ष लागवड करण्यात आली आहे. त्यात मियावाकी वृक्ष लागवडीचा समावेश आहे. ठाण्यातील बांधकामस्थळी नियमितपणे धूळ नियंत्रणाची कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच मोठ्या रस्त्यांच्या सफाईसाठी यांत्रिक सफाईची पध्दतही वापरली जात आहे. धूळ प्रदूषण नियंत्रणाबाबत विविध स्तरांवर जनजागृती करण्यात येत असून ठाणे मधील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली असल्याची नोंद सदर सन्मानासाठी घेण्यात आली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली