महापालिका रुग्णालयात स्टंटबाजी करणे मनसैनिकांच्या अंगलट
नवी मुंबई : महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्याने शवागरातील मृतदेह कापडामध्ये बांधून देण्यासाठी २ हजार रुपये घेतल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महापालिका रुग्णालय वैद्यकिय अधीक्षकांच्या कार्यालयात घुसून त्यांच्या विरोधात बेकायदेशीररित्या आंदोलन करणे मनसैनिकांच्या अंगलट आले आहे. वाशी पोलिसांनी या मनसैनिकांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तसेच वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था (हिंसक कृत्ये, मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध) अधिनियम २०१० चे कलम ४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांच्यावर पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.
वाशीतील नवी मुबंई महापालिका रुग्णालयात शवागरातील मृतदेह कापडात व्यवस्थित गुंडाळून देण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्याने मृताच्या नातेवाईकांकडून २ हजार रुपये उकळले होते. सदर प्रकार सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर महापालिका रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांनी संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्यावर तत्काळ बडतर्फीची कारवाई केली होती. मात्र, त्यानंतर देखील ‘मनसेे'चे कार्यकर्ते सागर विचारे, संजय शिर्के, सागर तांबे, संतोष मोतसिंग, संदेश खांबे, प्रविण माने, शैलेश पाचंगे, अक्षय त्रिमुखे, संगीता वंजारे, दिपाली ढऊळ यांच्यासह इतर १० ते १५ मनसैनिकांनी कोणत्याही प्रकारे कायदेशीर परवानगी न घेता, तसेच पूर्व कल्पना न देता, बेकायदेशीर जमाव जमवून रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयात घुसून गोंधळ घातला.
त्यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश म्हात्रे यांनी संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यात आल्याची माहिती आंदोलनकर्त्या मनसैनिकांना दिल्यानंतर देखील सदर कार्यकर्त्यांनी डॉ. म्हात्रे यांना अर्वाच्च भाषेमध्ये दमदाटी केली. तसेच ते त्यांच्या अंगावर धावून गेले. यावेळी सुरक्षारक्षकांनी मनसैनिकांची अडवणूक केली असता, मनसैनिकांनी त्यांना आणि अधीक्षकांना धक्काबुक्की करुन जबरदस्तीने त्यांच्या गळ्यात मृतदेहाला घालण्यात येणारा सफेद रंगाचा कपडा घातला. यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून आरडा-ओरड केली. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी वैद्यकीय अधीक्षकांकडे राजीनामा देण्याची मागणी करत त्यांना अर्वाच्च आणि निंदनीय भाषा वापरुन त्यांना अपमानित केले.
त्यानंतर या कार्यकर्त्यांनी सदर प्रकाराचा तयार केलेला व्हिडीओ प्रासरमाध्यमांना देऊन तसेच सोशल मिडीयावर प्रसारीत करुन डॉ. राजेश म्हात्रे यांची तसेच नवी मुंबई महापालिका सार्वजनिक रुग्णालयाची बदनामी केली. या प्रकारानंतर डॉ. राजेश म्हात्रे यांनी वाशी पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार वाशी पोलिसांनी बेकायदेशीर आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर पुढील कार्यवाईला सुरुवात केली आहे.