तळोजा एमआयडीसी ते वाघीवली खाडी पर्यंतच्या ‘सांडपाणी वाहिनी'चे काम पूर्ण

खारघर : तळोजा औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांमधून निर्माण होणाऱ्या औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करुन प्रक्रियायुक्त सांडपाणी वाहून नेण्यासाठी ६३० मीमी व्यासाची सांडपाणी वाहिनी वाघिवली खाडी पर्यंत टाकण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सदर सांडपाणी वाहिनी विसर्जन बिंदूपासून पुढे वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे तळोजा औद्योगिक क्षेत्र परिसर दुर्गंधीमुक्त झाल्याने तळोजा औद्योगिक क्षेत्रातील रहिवाशांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

तळोजा औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात रासायनिक कारखान्यांसह इतर उद्योगधंदेही सुरु आहेत. तळोजा औद्योगिक क्षेत्रात पाण्याची गरज भासते त्यावेळी कारखान्यांमधील रसायनमिश्रित सांडपाण्यावर सीईटीपीमध्ये प्रक्रिया केली जाते. मात्र, जुनाट आणि जीर्ण झालेल्या सांडपाणी वाहिनीतून गळती होत असल्यामुळे तसेच सांडपाण्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असल्याने पर्यावरण प्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात होती. दरम्यान, सदर सांडपाणी कोपरा खाडी मध्ये पाण्याची विल्हेवाट लावण्यात येत असल्यामुळे रोडपाली, नावडे, खारघर आदी भागात दुर्गंधी पसरत आहे, या तव्रÀारीची याचिका माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी हरित लवादाकडे केली होती. अरविंद म्हात्रे यांच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान तळोजा औद्योगिक वसाहत मधील दुर्गंधीच्या समस्याबाबत ताशेरे ओढण्यात आले होते. या सर्व गोष्टींचा विचार करुन एमआयडीसी प्रशासनाने केंद्र सरकारच्या एका संस्थेच्या शिफारसी नुसार तळोजा औद्योगिक वसाहत मधील सांडपाणी वाहून नेणाऱ्या जलवाहिनीची लांबी वाढवण्याचा निर्णय घेतला होता. एमआयडीसी मार्फत तळोजा औद्योगिक वसाहत मधून वाघिवली पर्यंत सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.

दरम्यान, खारघर, दिवाळे परिसरातील खाडीत मासेमारी व्यवसाय करणाऱ्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सदर सांडपाणी वाहिनी विसर्जन बिंदूपासून पुढे वाढविण्याचे निर्देश दिले आहेत.

तळोजा औद्योगिक वसाहत मधून वाघीवली पर्यंत सांडपाणी वाहिनी जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. वाघीवली पासून पुढे विसर्जन बिंदू पर्यंत सांडपाणी वाहिनी वाढविण्याचे काम विविध यंत्रणांकडून परवानगी प्राप्त होताच सुरु करण्यात येणार आहे. - दीपक बोबडे, कार्यकारी अभियंता -  तळोजा एमआयडीसी.  

तळोजा एमआयडीसी मधील सीईटी प्रकल्पाचे काम योग्यरित्या झाल्याचे चित्र दिसत नाही. अजूनही नदी, नाल्यात सांडपाणी वाहत असून, त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. याविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.- अरविंद म्हात्रे, माजी नगरसेवक - नावडे गाव. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘माझी वसुंधरा' अंतर्गत ‘वसुंधरा महोत्सव'