पनवेलमध्ये वनविभागाची धडक कारवाई :
पनवेल : पनवेल तालुक्यातील उलवे नोड परिसरात वनविभागाने वाईल्ड लाइफ वेल्फेअर असोसिएशनच्या मदतीने मोठी कारवाई करत पक्षांची तस्करी करणाऱया दोघांची धरपकड केली आहे. देवेंद्र लालचंद पाटील व हरेश दामोदर पाटील अशी या दोघांची नावे असून वन विभागाने त्यांच्याकडून 42 संरक्षित मुनिया प्रजातीचे पक्षी जप्त केले आहेत. हे पक्षी त्यांनी कुणाकडुन आणले याचा वनविभागाकडुन तपास करण्यात येत आहेत.
उलवे सेक्टर-8 मधील पेट शॉपमध्ये दुर्मिळ जातीच्या पक्षांची विक्री केली जात असल्याची माहिती वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली होती. याबाबतची माहिती त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर वनविभागाचे डीसीएफ राहुल पाटील व एसीएफ माळी यांच्या मार्गदर्शनाखाली आरएफओ कोकरे, वनपाल पाटील, वनपाल माने, वाईल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशनचे रघुनाथ जाधव व वनरक्षक स्टाफ यांच्या संयुक्त पथकाने 18 ऑगस्ट रोजी उलवे सेक्टर-8 मधील पेट शॉपवर छापा टाकण्यात आला.
यावेळी सदर पेट शॉप मध्ये रेड मुनीया, स्केली-ब्रेस्टेड मुनीया आणि ट्रायकलर्ड मुनीया या दुर्मीळ व संरक्षित प्रजातींचे पक्षी विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे आढळून आले. त्यानंतर वनविभागाने त्यानंतर वनविभागाने देवेंद्र पाटील व हरेश पाटील या दोघांविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 9, 39, 48(अ), 51 अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. या दोघांना पनवेल न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.