आकुर्ली ते नेरे रस्त्याची दयनीय अवस्था
नवीन पनवेल : आकुर्ली ते नेरे रस्त्याची सध्या दयनीय अवस्था झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. सदर खड्डे प्रवाशांना, वाहन चालकांना त्रासदायक ठरत आहेत. संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर खड्डे बुजवावेत आणि रस्ता चांगला करावा, अशी मागणी केली जात आहे.
येथील रस्त्यावर चिपळे, बोनशेत, कोप्रोली गावाजवळ मोठमोठे खड्डे पडले आहेत. पनवेल-माथेरान रोड परिसरात जाण्या-येण्यासाठी मोठ्या प्रमाणात वर्दळ आणि वाहतूक होत आहे. दररोज मोठ्या प्रमाणात स्कुल व्हॅन, बसेस, रिक्षा, दुचाकी, कारने प्रवासी प्रवास करत असतात. या खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील होत आहे. आकुर्ली जवळ देखील मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यांमुळे वाहनांचे अपघात होत आहेत. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
चिपळे, बोनशेत, भोकरपाडा जवळ मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे नागरिकांची खड्ड्यातून प्रवास करताना त्रेधातीरपीट उडत आहे. खड्ड्यांमुळे अनेक अपघात देखील झाले आहेत. मात्र, प्रशासनाला त्याचे काही सोयर-सुतक नाही. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत आहे. तसेच प्रवास करताना देखील उशीर होत आहे. या खड्ड्यातून प्रवास करताना प्रशासनाला रोज शिव्या शाप नागरिक आणि प्रवासी देत आहेत. येथील खड्डे लवकरात लवकर बुजवावेत, अशा मागणीचे निवेदन ‘शेकाप'चे माजी जिल्हा परिषद सदस्य विलास फडके, ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष'चे आदित्य जानोरकर यांनी दिले आहे.