मिरा-भाईंदर शहरात १० शाळा अनधिकृत

भाईंदर : मिरा-भाईंदर शिक्षण विभागाकडून शहरातील १० शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यातील ८ शाळा झोपडपट्टी आणि आदिवासी पाड्यातील आहेत. दरम्यान, अनधिकृत शाळांवर प्रशासन ठोस कारवाई करत नसल्याने संख्येत वाढ होत असून विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

मिरा-भाईंदर शहराच्या विविध भागात शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी न घेता सरार्सपणे अनधिकृत शाळा चालवल्या जात आहेत. शिक्षण विभागाने त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित असते. परंतु, शिक्षण विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने संख्येत वाढ होत आहे. अनेकदा पाल्याचा प्रवेश घेतल्यानंतर शाळा अनधिकृत असल्याची माहिती पालकांना समजते. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांची फसवणूक होऊन त्यांना मानसिक त्रास होतो. तसेच आर्थिक नुकसान सुध्दा होते.

दुसरीकडे अनधिकृत शाळा रोखण्यासाठी शिक्षण विभागाकडून दरवर्षी शाळांचे सर्वेक्षण करुन त्यातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली जाते. गेल्यावर्षी २०२३-२४ मध्ये ७ अनधिकृत शाळा आढळून आल्या होत्या. या शाळांवर कारवाई झाली नाही. त्यामुळे २०२४ -२५ मध्ये या आकडेवारीत वाढ झाली आहे. अनधिकृत शाळा प्रामुख्याने झोपडपट्टी परिसर आणि आदिवासी पाड्यात असल्याचे दिसून येते. अनधिकृत शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्या शाळेतील विद्यार्थांना जवळच्या शाळेत स्थलांतरीत करण्याच्या पर्यायावर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या प्रभारी शिक्षण अधिकारी दिपाली जोशी यांनी दिली.

अनधिकृत शाळांची यादीः
नोव्हा स्कुल- काशिमीरा (डाचकुल पाडा), पॉवर कीड- काशिमीरा (डाचकुल पाडा), माय छोटा स्कुल-काशिमीरा (डाचकुल पाडा), आर. डी. मेमोरियल स्कुल-काशिमीरा (डाचकुल पाडा), सोल ऑफ गॉड काशिमीरा (माशाचा पाडा), विराज स्कुल- काशिमीरा (माशाचा पाडा), ट्रीनिटी स्कुल-काशिमीरा (पेणकर पाडा), सेन्स शेल्स किंगडम स्कुल -मिरा रोड (रामदेव पार्क), इकरा इंटरनॅशनल स्कुल-मिरा रोड, कानकधारा इंग्लिश स्कुल-भाईंदर. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

ठाणे जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत बदल