तुर्भे येथील अनधिकृत वाहन पार्किंग, गॅरेजवर कारवाई
तुर्भे : तुर्भे येथील अनधिकृत पार्किंग आणि गॅरेजवर नवी मुंबई महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात आली. यामुळे तुर्भे येथील अनधिकृत गॅरेजवाले आणि अनधिकृत पार्किंग करणारे वाहन चालक यांचे धाबे दणादले आहे.
‘वाशी-तुर्भे लिंक मार्गावर अनधिकृत पार्किंग आणि गॅरेजवाल्यांचा उपद्रव' या मथळ्याखाली ‘दैनिक आपलं नवे शहर' मध्ये बातमी प्रसिध्द करण्यात आली होती. या बातमीची नोंद घेत तुर्भे येथील अनधिकृत पार्किंग आणि गॅरेजवर धडक कारवाई करण्यात आली आहे.
वाशी-तुर्भे लिंक मार्गावर तुर्भे उड्डाणपूल ते अरेंजा चौकापर्यंत अनधिकृत पार्किंग आणि गॅरेजवाल्यांनी त्यांचे बस्तान मांडले होते. यामुळे वाहतूक कोंडी आणि पादचारी यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याशिवाय स्वच्छ भारत अभियान उपक्रमातही बाधा निर्माण होत होती.
एपीएमसी वाहतूक नियंत्रण शाखा तर्फे कारवाई
एपीएमसी वाहतूक नियंत्रण शाखा तर्फे तुर्भे सेक्टर-२०,२१,१८ या परिसरात ‘नो पार्किंग'च्या ठिकाणी गाड्यांची पार्किंग करणाऱ्या ९० वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाई मध्ये १ लाख रुपयांपेक्षा अधिक रवकम दंड स्वरुपात वसुल करण्यात आली. या मोहीमेत २ गॅरेज चालकांवर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याबद्दल कारवाई करण्यात आली. या कारवाई मध्ये गुलशन आलम, पटेल यांच्यावर एपीएमसी पोलीस ठाणे मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती ‘एपीएमसी वाहतूक नियंत्रण शाखा'चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी भांडवलकर यांनी दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी भांडवलकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार सुभाष हिले, परमेश्वर पडळकर, म्हात्रे, किर्वे, बनकर यांच्या पथकाने सदर धडक कारवाई केली.
नवी मुंबई पोलीस उपायुक्त (वाहतूक) तिरुपती काकडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त वि्ील कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता आणि पदपथ यांवर दुचाकी आणि रिक्षा यांची दुरुस्ती करुन वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या अवैध गॅरेज चालकांवर यापुढेही धडक कारवाई करण्यात येणार आहे, असे शिवाजी भांडवलकर यांनी सांगितले.
दरम्यान, नवी मुंबई महापालिका तुर्भे विभाग सहाय्यक आयुक्त प्रबोधन मवाडे यांनीही एपीएमसी वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने वाशी अरेंजा चौक येथील अनधिकृत बस पार्किंगवर कारवाई केली.
प्रबोधन मवाडे यांच्या नेतृत्वाखाली लिपिक कुंदन पुराडकर यांनी अतिक्रमण विरोधी पथकाच्या माध्यमातून अरेंजा चौक ते कांदा बटाटा मार्केट गेट क्रमांक-२ पर्यंतच्या रस्त्यावर बेकायदा पार्किंग करण्यात येणाऱ्या बस आणि ट्रक यांच्यावर कारवाई केली. या कारवाईमध्ये लिपिक कुंदन पुराडकर यांनी वाहतुकीस अडथळा करणाऱ्या वाहनांना जॅमर लावला. तसेच बस आणि ट्रक चालकांकडून ३२ हजार पेक्षा अधिक रवकम दंड स्वरुपात वसूल करण्यात आली.
दरम्यान, महापालिका उपायुक्त (अतिक्रमण) भागवत डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही तुर्भे येथील अनधिकृत वाहन पार्किंग, गॅरेजवर कारवाई अधिक प्रभावीपणे करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रबोधन मवाडे यांनी दिली.