महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
तळोजा वसाहतीत भटक्या कुत्र्यांचा उच्छाद ; सात वर्षीय बालकाला चावा
खारघर : तळोजा शहरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढला आहे. तळोजा शहरातील मुख्य रस्त्यावर, गल्लीत जथ्थ्याने फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांमुळे लहान मुले-मुली, वृध्द नागरिक तसेच दुचाकीवरुन जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तळोजा मधील आसावरी सोसायटी मध्ये राहणाऱ्या ७ वर्षीय बालकांचे भटक्या कुत्र्याने लचके तोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पनवेल महापालिका प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी तळोजा मधील नागरिकांकडून केली जात आहे.
पनवेल महापालिका हद्दीतील मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी महापालिकेने एक एजंसी नेमली आहे. मात्र, निर्बीजीकरणामुळे कुत्र्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. तळोजा परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. परिसरात रस्त्याने सायकल, दुचाकीवरुन जाणाऱ्या व्यक्तीच्या मागे भटकी कुत्री लागतात. त्यामुळे वाहनावरुन पडून किरकोळ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सकाळी-संध्याकाळी भटवया कुत्र्यांचे कळप रस्त्यावर बिनधास्त फिरताना दिसतात. तळोजा फेज-२ मधील सिडको निर्मित आसावरी, मारावा, केदार आदी हौसिंग सोसायटी तसेच परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्याचे रहिवाशांनी सांगितले. रहिवाशांनी लहान मुलांना कुत्र्याने चावा घेतल्याची माहिती देताच काही वेळाने श्वानपथक दाखल झाले. विशेष म्हणजे यावेळी चावा घेतलेल्या कुत्र्यांना पकडण्यासाठी सोसायटी मधील अभिजीत धुमाळ, दिनेश वाघ, रवींद्र गवळी, मच्छिन्द्र खेडकर, अल्ताफ मुलानी आदींनी सहकार्य केले, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
कुत्र्यांच्या हल्ल्यात बालक गंभीर जखमी
तळोजा फेज-२ मधील आसावरी सोसायटी मध्ये राहणारा ७ वर्षीय बालक अहान अतिक खान घराबाहेर पडताच मोकाट कुत्र्यांनी त्याच्या पाठीवर आणि डोक्यावर चावा घेतल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आहे. मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्यानंतर अहान खान याच्या पालकांनी त्याला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले. अहान खान याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, सात टाके पडले आहेत. डॉक्टरांनी अहान खान याला प्रतिबंधात्मक लस देऊन घरी सोडले आहे, अशी माहिती जखमी झालेल्या अहान खान याचे वडील अतिक खान यांनी दिली.
कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचा मुद्दा ऐरणीवर
तळोजा मधील आसावरी सोसायटी मध्ये घडलेल्या घटनेमुळे तळोजा शहरातील भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पनवेल महापालिका प्रशासन तर्फे मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याचे काम केले जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, तळोजा परिसरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने महापालिकेने मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याचे काम त्वरित सुरु करावे, अशी मागणी तळोजा मधील नागरिकांकडून केली जात आहे.
तळोजा फेज-२ मधील सिडको हौसिंग सोसायटी परिसरात मोकाट कुत्र्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लहान मुलांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती परिसरात पसरताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पनवेल महापालिकेने तळोजा परिसरातील मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करणे आवश्यक आहे. - राहुल निर्मल, रहिवासी - आसावरी हौसिंग सोसायटी, तळोजा फेज-२.
लहान मुलाला भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती प्राप्त होताच पनवेल महापालिकेच्या श्वान पथकांनी चावा घेतलेल्या कुत्र्याला पकडले आहे. महापालिकेकडून श्वान निर्बिजीकरण करण्याचे काम नियमितपणे सुरु आहे. तळोजा परिसरात पाहणी करुन भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले जाणार आहे. - डॉ. बी. एन. गिते, अधिकारी - पनवेल महापालिका.