कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाला लवकरच गती

भिवंडी : मुरबाडच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा पूर्ण असलेला मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाला लवकरात लवकर गती द्यावी, अशी मागणी ‘भिवंडी'चे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.

दिल्ली येथे खासदार सुरेश म्हात्रे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांची भेट घेत कल्याण-मुरबाड या रखडलेल्या प्रकल्पावर सखोल चर्चा केली. त्यामुळे रखडलेला कल्याण-मुरबाड प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागणार असल्याचे संकेत खासदार म्हात्रे यांनी दिले आहेत.

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मुरबाड तालुका ‘रेल्वे'चे जनक नानाशंकर शेठ यांची जन्मभूमी असून मागील ५० वर्षांपासून कल्याण-मुरबाड रेल्वे न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. या रखडलेल्या रेल्वे प्रकल्पामुळे मुरबाडचा सर्वांगीण विकास रखडलेला आहे. सन २०२२-२३ मध्ये कल्याण-आंबिवली-मुरबाड या २८ किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वे मार्गाला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. मात्र, या रेल्वे मार्गाचे केवळ ५ टक्के कामच मार्गी लागले आहे. या रेल्वे मार्गासाठी सर्वात मोठी अडचण असलेले भूमी अधिग्रहण विषय प्रलंबित असून निधी आणि तांत्रिक अडचणींमुळे सदर प्रकल्प रखडलेला आहे.

त्यामुळे या प्रकल्पाकडे विशेष लक्ष देऊन लवकरात लवकर सदर प्रकल्प मार्गी लावावा, अशी मागणी खा. सुरेश म्हात्रेे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. रेल्वेमंत्री वैष्णव यांच्यासोबत झालेल्या बैठकीत रेल्वेमंत्र्यांनी लवकरात लवकर कल्याण-मुरबाड प्रकल्पातील अडचणी दूर करुन सदर प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावला जाईल, असे आश्वासन दिल्याची प्रतिक्रिया खासदार म्हात्रे यांनी दिली आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

भारतीय सैन्याचे शौर्य संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद- ना. गणेश नाईक