खड्डेमय रस्त्याला केडीएमसी आयुक्तांचे नाव

कल्याण : पावसाने उसंत घेऊन आठवडा उलटला तरी देखील कल्याण-डोंबिवली मधील रस्त्यांवर अद्यापही खड्डे कायम असून रस्त्यांवरील या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. केडीएमसी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करुन देखील प्रशासन लक्ष देत नसल्याने अखेर ‘काँग्रेस'चे ब्लॉक अध्यक्ष शकील खान यांनी आमरण उपोषणाला सुरुवात करतानाच कल्याण पूर्वेतील न्यू गोविंदवाडी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये झाड लावून या रस्त्याला अभिनव गोयल आयुक्त मार्ग असे नामकरण करत अनोखे आंदोलन केले आहे.  

प्रभाग क्रमांक-४५ कचोरे येथील रस्ते दुरुस्तीसाठी ‘काँग्रेस'चे ब्लॉक अध्यक्ष शकील खान यांनी केडीएमसी प्रशासनाला पत्र दिले होते. या रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झालेली आहे. रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे देखील आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना लहान मुलांना वयोवृध्द लोकांना येण्या-जाण्यास त्रास होत आहे. तसेच वाहन चालकांना देखील त्रास होत आहे. यास रस्त्याच्या बाजुला २ शाळा आहेत. या शाळेतून इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी शाळेत येण्या-जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात. आजारी असलेल्या रुग्णांना तसेच गर्भवती स्त्रियांना हॉस्पिटलमध्ये नेताना अशा रस्त्यांवर दुर्घटना होऊ शकते.

गणपती आणि नवरात्री सण येऊन गेले, आता दिवाळी येईल; परंतु पत्र देऊन देखील नागरिकांसाठी रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याच्या निषेधार्थ ‘काँग्रेस'चे ब्लॉक अध्यक्ष शकील खान यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. तसेच महापालिका प्रशासनाच्या निषेधार्थ रस्त्यावरील या खड्ड्यामध्ये झाड लावत त्या रस्त्याचे अभिनव गोयल आयुक्त मार्ग असे नामकरण केले आहे. दरम्यान, प्रशासनाने याची दखल न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा खान यांनी दिला आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

२४ तासांचा शटडाऊन; पण १२० तास पाणी नाही