प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमेंतर्गत ८५ हजार रुपये दंडात्मक वसूली

नवी मुंबई : प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांव्दारे एकल वापरातील प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी  नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महापालिकेची विशेष पथके मार्केटमध्ये तपासणी करण्यासह प्लास्टिक साठा वितरणासाठी वाहतुक करणाऱ्या वाहनांवरही लक्ष ठेवून कारवाई करीत आहेत.

महापालिका (परिमंडळ-२) प्लास्टिक प्रतिबंधात्मक भरारी पथकाने महापालिका उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली १७ एप्रिल रोजी महापे एमआयडीसी परिसरात दुचाकी वाहनावरुन प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा २० किलो साठा वाहून नेणाऱ्या दुचाकी वाहनावर कारवाईचा बडगा उगारुन त्याच्याकडील प्लास्टिक जप्त करुन ५ हजार रुपये दंडात्मक रक्कम वसूल केली. या पथकाने १८ एप्रिल रोजी ऐरोली टोल नाका येथे ६० किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक दुचाकीवरुन वाहतुक करणाऱ्या व्यक्तीकडूनही ५ हजार रुपये दंडात्मक रक्कम वसूली करुन ६० किलो प्लास्टिक जप्त केले.

महापालिका प्लास्टिक प्रतिबंधात्मक भरारी पथकाने १७ एप्रिल रोजी कोपरखैरणे सेक्टर-१८ मधील रावराय जनरल स्टोअर्स मधून ५ किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करुन ५ हजार रुपये तसेच ऐरोली सेक्टर-२० मध्ये महेंद्र प्रजापती यांच्याकडूनही १ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करुन ५ हजार रुपये दंडात्मक रक्कम वसूल केली.

महापालिका (परिमंडळ १ आणि २) प्लास्टिक प्रतिबंधात्मक भरारी पथकांमार्फत उपआयुक्त सोमनाथ पोटरे आणि डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात १७ व्यक्ती आणि व्यावसायिकांकडून ८५ हजार रुपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली असून, २८३ किलो ७०० ग्रॅम प्रतिबंधात्मक एकल वापर प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला आहे.  

दरम्यान, एकल वापर प्लास्टिकमुळे मानवी जीवनाला आणि पर्यावरणाला पोहचणारा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी स्वतःहून स्वयंस्फूर्तीने प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णतः टाळून कापडी किंवा कागदी पिशव्यांचा पर्याय निवडावा तसेच व्यावसायिकांनीही आपल्या वस्तू देण्यासाठी प्लास्टिक पिशव्या देऊ नयेत आणि प्लास्टिक पिशव्या दुकानात ठेवूच नयेत, असे आवाहन नवी मुंबई महापालिका तर्फे करण्यात आले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘सिडको'च्या हस्तांतरण शुल्कास विरोध