दीड दिवसीय गणरायाला भावपूर्ण निरोप

उरण : गणपती बाप्पाचे आगमन २७  ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी दिवशी झाले .दीड दिवसाच्या मुक्काम नंतर २८ ऑगस्ट रोजी दीड दिवसीय गणपती बाप्पाला भावपूर्ण वातावरणात भक्तीभावाने उरण शहरासह ग्रामीण भागात निरोप देण्यांत आला. उरण तालुवयातील ग्रामीण भागात नदी, तलाव मध्ये श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

‘उरण नगरपरिषद'चे मुख्याधिकारी समीर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उरण नगरपरिषद तर्फे उरण मधील विमला तलाव, भोवरा तलाव आणि मोरा जेट्टी येथे भाविकांना श्रीमूर्तींचे विसर्जन करताना कोणतीही गैरसोय होणार नाही, याकरिता चांगली व्यवस्था करण्यात आली. विसर्जन स्थळी उरण नगरपरिषद तर्फे कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

उरण नगरपरिषद तर्फे या वर्षापासून ‘प्लास्टर ऑफ पॅरीस'च्या गणपती मूर्ती विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावाची उभारणी करण्यात आली होती. या तलावामध्ये ‘प्लास्टर ऑफ पॅरीस'च्या गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर शाडू माती पासून बनविलेल्या गणेश मूर्तींचे विमला तलावात विसर्जन करण्यात आले. उरण शहरातील देऊळवाडी येथील गणपती विसर्जन मित्र मंडळ सदस्यांनी गणेश मूर्ती विसर्जन करण्याचे काम व्यवस्थित केले .

यावेळी ‘उरण नगरपरिषद'चे मुख्याधिकारी समीर जाधव, प्रशासकीय अधिकारी राजेंद्र घाडगे, विशाल गायकवाड, संजय परदेशी, हर्षद कांबळे, संदेश शिरकुरकर, आकाश कवडे, सुनील जाधव, धनेश कासारे, हितेंद्र जाधव, नितीन मोहिते, दीक्षय गायकवाड, ‘नागरिक संरक्षण दल'चे रायगड चीफवार्डन नवीन राजपाल आदि उपस्थित होते.

श्रीमूर्ती विसर्जन स्थळी ‘उरण पोलीस ठाणे'चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एच. डी. मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणे जिल्ह्यात १३ सप्टेंबर २०२५ रोजी ‘राष्ट्रीय लोक अदालत'