‘स्त्रियांना आलेले आत्मभान हे प्रदीर्घ स्त्रीमुक्ती चळवळीचे फलित' - डॉ वृषाली मगदूम

नवी मुंबई : स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरु झालेल्या स्त्रीमुक्ती चळवळीची आजही तेव्हढीच गरज आहे, सगळ्यांचे राहणीमान सुधारले. त्याबरोबरच स्त्रियांचेही सुधारले. पण या सुधारणेमुळे स्त्रीचे व्यक्तिमत्व स्वतंत्र झाले असे नाही. या चळवळीने स्त्रियांना आत्मभान जरूर आले आहे. आता हे आत्मभान घेऊन समानतेसाठी स्त्रियांना आणखी पुढे जायचे आहे. त्यासाठी भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरसुद्धा महिला दिन व्यापकपणे साजरा होणे गरजेचे आहे असे उद्‌गार स्त्रीमुक्ती चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या  विचारवंत प्रा. डॉ. वृषाली मगदूम यांनी नेरूळ येथील कार्यक्रमात काढले.

नवरंग साहित्य, संस्कृती आणि कला मंडळ नेरूळ यांनी जागतिक महिला दिनानिमित्त ३ मार्च रोजी येथील सेवाधारी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात आयोेजित केलेल्या नवरंग साहित्य-संस्कृती कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी नागपूर येथून आलेल्यासाहित्यिक आणि विचारवंत प्रा. डॉ. विनिता हिंगे आपल्या भाषणात महिलांवरील अत्याचारांवर भाष्य करताना  म्हणाल्या की ज्योतिबा-सावित्रीबाईंनी सुरु केलेले स्त्रीशिक्षण आता खूप प्रगत झाले आहे. इतके की, एकीकडे स्त्रिया आधुनिक भौतिक साधने, आणि समाज माध्यमांचा मुक्तपणे वापर करत आहेत. तर दुसरीकडे रोजच्या वर्तमानपत्रातल्या बलात्काराच्या आणि स्त्रियांवरच्या अत्याचाराच्या बातम्या कमी न होता सतत वाढत आहेत. नवरंग मंडळाचे अध्यक्ष, लेखक गजआनन म्हात्रे यांनी पाहुण्यांचे आणि उपस्थितांचे ग्रंथ देऊन स्वागत केले. नवरंग मंडळाच्या सदस्या प्रा. दुर्गा देशमुख यांनी सुप्रसिद्ध लेखक नारायण सुर्वे यांच्या पत्नी कृष्णाबाई सुर्वे यांच्या ‘मास्तरांची सावली' या आत्मचरित्रातील उतारे सादर केले. प्रा. डॉ.कल्पना मुनघाटे यांनी सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांच्या पत्नी यशोदाबाई यांच्या ‘कुणास्तव कुणीतरी' या आत्मचरित्रातील काही उताऱ्यांचे कथन केले. कार्यक्रम प्रमुख श्रीमती पाकिजा आत्तार यांनी नवरंग मंडळाच्या विविध साहित्यिक, सामाजिक उपक्रमांचा आढावा सादर केला. या महिला दिनाचे औचित्य साधून नवरंग मंडळाच्या कवयित्री निवृत्त न्यायाधीश डॉ. चंदा नाथानी यांनी आणि श्रीमती स्नेहल गडकरी यांनी स्वरचित कविता तर ‘नवरंग'च्या गायिका श्रीमती सुलक्षणा पवार यांनी महिला गीते सादर केली. श्रीमती मंगला उदामले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ सौ कल्पना मुनघाटे यांनी सर्वांचे आभार मानले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘बाल स्नेही पुरस्कार' समतोल फाउंडेशन, ठाणे यांना प्रदान