लग्नपत्रिका झाली ऑनलाईन, डिजीटल पत्रिकेचा ट्रेंड
प्री-वेडींग शुटिंगचेही फॅड
उरण : भारतात अनेक परंपरा आणि रितीरिवाज आहेत. भारतीय संस्कृतीत लग्न एक संस्कार मानला गेला आहे. कालांतराने लग्न आणि त्या संबंधित काही रितीरिवाज मध्ये बदल घडत होत आहेत. लग्न म्हणजे लग्नपत्रिका आली. लग्नपत्रिका शिवाय लग्नाचा विचार करुच शकत नाही. लग्नाचा अविभाज्य घटक म्हणजे लग्नपत्रिका. पूर्वी घरोघरी जाऊन लग्नपत्रिका देऊन घरातील नातेवाईक, मित्र मंडळी यांच्याशी योग्य तो संवाद साधला जायचा. अगोदर लग्न या महत्वाच्या विधी पूर्वी छापील लग्नपत्रिका नातेवाईकांच्या घरी प्रत्यक्ष भेट देत दारात अक्षता ठेवून दिले जायचे. पण, बदलत्या काळात छापील लग्नपत्रिकाची जागा आता डिजीटल लग्नपत्रिकेने घेतली आहे. आता तरी लग्नपत्रिका ऑनलाईन झाल्याने कागदी लग्नपत्रिकांचा ट्रेंड मागे पडत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे.
अलिकडच्या काळात तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली. यामुळे प्रत्येक क्षेत्रात आमुलाग्र बदल झाला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात निमंत्रणही ऑनलाईन झाले आहे. पूर्वीच्या काळी नातेवाईकांच्या घरी जाऊन निमंत्रण दिले जात होते. त्यानंतर साध्या पध्दतीच्या पत्रिका छापून घरपोच घेऊन जायची. ते नातेवाईक सन्मानाचे निमंत्रण समजत होते. त्यामुळे संपूर्ण कुटुंब त्या कार्यात सहभागी होत असे. आता ऑनलाईन पत्रिका पाठविण्याचे ट्रेंड सुरु आहे.
दुसरीकडे लग्नाच्या अगोदर इच्छुक पती-पत्नी यांना एकत्र बोलावून फोटो काढण्याचे प्रमाण वाढले आहे. याला प्री-वेडींग शुटींग असे म्हणतात. प्री-वेडींग शुटींगचे मार्केट झपाट्याने विस्तारत असताना ऑनलाईन निमंत्रण देण्याला चांगलेच महत्त्व आले आहे. विशेषतः तरुणांचा सोशल साईटवर डिजीटल लग्नपत्रिका टाकण्याकडेही कल वाढला आहे. विशेष म्हणजे लिखित पत्रिकेची थेट दृकश्राव्य स्वरुपातील निमंत्रण दिले जात आहे.
मोबाईल क्रांतीचा फायदा...
पूर्वी घरोघर आणि गावोगावी जाऊन लग्नपत्रिका वितरित करावी लागत असे. लग्नाचे दिवस जसे जवळ आले त्यात कोणाकडे निमंत्रण पत्रिका पोहोचली नाही याची चिंता लागलेली असायची. आता मोबाईल क्रांतीमुळे ती चिंता देखील मिटली आहे. शिवाय ऑनलाईन पत्रिकांचे विविध प्रकार उपलब्ध असल्याने पत्रिकेत पाहिजे तसे बदल करता येतात. नवनवीन पध्दतींचा नागरिकांनी स्वीकार केला असून नागरिकांनी चालत्या काळानुसार आणि गरजेनुसार बदल स्वीकारल्याने लग्नपत्रिकेचा अट्टाहास आताच कमी होत चालल्याचे चित्र आहे.
खर्चात बचत...
आता सोशल मिडीयावर लग्नपत्रिका पाठवून फोन करुन कळविली जाते. त्यामुळे शेकडोच्या संख्येने छापण्यात येणाऱ्या लग्नपत्रिका आता केवळ ५०-१०० छापल्या जात आहेत. परिणामी, आता लग्नपत्रिका प्रत्यक्ष भेटून देण्याची पध्दत मागे पडू लागली आहे.
माझ्या लग्नाला व्हॉटस्ॲप सारख्या सोशल मिडीयाच्या प्लॅटफॉर्मवर आमंत्रण देण्यामुळे प्रचंड वेळ वाचला आणि सर्वांनी हजेरी लावली. खर्चही कमी प्रमाणात झाला. यास नातेवाईकासह मित्रमंडळींनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. सोशल मिडीयाचा वापर केल्याने माझ्या वेळ आणि पैशाची बचत झाली आहे. शिवाय चांगला प्रतिसादही मिळाला आहे.
संगम पाटील, उरण.