ठामपा सेवेत २५ कर्मचाऱ्यांना वारसा हक्काने कायम नियुक्ती

ठाणे : वारसा हक्काने ठाणे महापालिका सेवेत लागलेल्या २५ कर्मचाऱ्यांना नुकतीच कायम नियुक्ती देण्यात आली. जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत वारसा हक्काच्या एकूण ३०० जणांना महापालिकेच्या सेवेत कायम करण्यात आले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नियुक्तीपत्रे मिळाल्याने सदर महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनात आस्थापना विभागाने विशेष मोहीम राबवून सदर नियुक्ती प्रक्रिया पूर्ण केली आहे.

‘लाड-पागे समिती'च्या शिफारशींच्या अनुषंगाने जे सफाई कर्मचारी सेवानिवृत्त किंवा स्वेच्छानिवृत्त होतात त्यांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत नियुक्ती देण्यात येते. अशी नियुक्ती देण्यात आलेल्या सफाई कर्मचाऱ्यांची ३ वर्षांची सेवा पूर्ण झाल्यावर त्यांना महापालिकेच्या सेवेत कायम केले जाते.

आस्थापना विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम घेऊन कागदपत्रांची पूर्तता करुन घेतली. कर्मचाऱ्यांच्या वारसांना सामावून घेण्यासाठी अत्यंत पारदर्शीत पध्दतीने भरती प्रक्रिया करण्यात आली आहे. या वारसांपैकी, महापालिकेच्या सेवेत वर्ग-३ चे १ आणि वर्ग-४ चे २४ अशा एकूण २५ कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. यापैकी काही पत्रे प्रातिनिधिक स्वरुपात नुकतीच महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते देण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त  प्रशांत रोडे, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप, आस्थापना अधिक्षक रश्मी कांबळी, आदि उपस्थित होते.

आतापर्यंत ठाणे महापालिकेच्या सेवेत वर्ग-३ चे ४७ आणि वर्ग-४ चे २५३ अशा एकूण ३०० कर्मचाऱ्यांची वारसा हक्काने नियुक्ती करण्यात आलेली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

डी.वाय.पाटील स्टेडियम परिसरात तीन दिवस वाहतूकीत बदल